भिवंडी इमारत दुर्घटनेची कळवा आणि विटाव्यात पुनरावृत्तीची भीती
ठाणे: कळवा खाडी आणि विटावा खाडीतील चाळींवर कर्तव्यतत्पर प्रभाग समिती प्रशासन वेळोवेळी तोडक कारवाई करीत आहे, मात्र कळवा, विटावा आणि खारीगावमधील अनधिकृत इमारतींना उघड उघड पाठीशी घातले जात असून भिवंडीतील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे पावसाळ्यात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
भिवंडी इमारत दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना या घटनेचे गांभीर्य मात्र ठाणे महापालिका प्रशासनाने घेतलेले दिसत नाही. कळव्यातील जयभारत मैदानाच्या शेजारी असलेली आठ मजली अनधिकृत इमारत अवघ्या चार महिन्यात उभी राहिली आहे. ही इमारत झटपट बांधून या ठिकाणी नागरिकांना ताबा देण्याची घाई देखील संबंधित विकासकांकडून सुरु आहे. खारीगाव येथे देखील धोकादायक पद्धतीने सुमार दर्जाच्या इमारती बेकायदेशीरपणे उभ्या राहिल्या आहेत. विटावा भागात तर चाळी जमीनदोस्त करीत असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाजूच्या अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या इमारती न दिसल्याने सहायक आयुक्तांच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.
कळवा, खारीगाव आणि विटावा भागातील अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या काही इमारतींवर या आधी थातुर मातुर कारवाई करण्यात आली, परंतु पुन्हा त्यावर स्लॅब चढवण्यात आले, यामुळे या इमारती धोकादायक झाल्या असून त्या कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
चाळींवर बुलडोझर चालवणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत इमारतींना पाठीशी घालण्यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप स्थानिक दक्ष नागरिक करत आहेत. भविष्यात भिवंडीसारखी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिकांनी आयुक्त अभिजित बांगर यांना विचारला आहे.
कळव्यातील जयभारत मैदानाशेजारी आठ मजली अनधिकृत इमारतींचे काम सुरू असून या इमारतीवर यापूर्वी पालिका प्रशासनाकडून कारवाईचा दिखावा करण्यात आला आहे. मात्र एकदा कारवाई होऊनही तसेच यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध होऊनही निर्ढावलेल्या स्थानिक विकासकांकडून अनधिकृतपणे मजले चढवणे सुरूच असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे केवळ थातुर मातुर कारवाई करण्यापेक्षा इमारत अनधिकृत आहे हे माहित असून प्रशासनाकडून इमारत जमीनदोस्त केली जात नसल्याने प्रशासन कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही इमारत रेल्वेच्या जागेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
*अशा अनेक अनधिकृत इमारती कळवा, खारीगाव आणि विटाव्यात असून ज्या महसूल, एमआयडीसी, जल संधारण आणि इतर आरक्षित जागांवर उभ्या राहिल्या आहेत. अशा सर्वच इमारतींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.