* ॲडलेडमध्ये उत्सवाचे दहावे वर्ष
* जगभर थेट प्रक्षेपण
ॲडलेड: दक्षिण ऑस्ट्रेलिया ॲडलेडच्या रस्त्यांवर लवकरच ढोल-ताशांचा आणि लेझीमचा नाद घुमणार आहे. “ऑस्ट्रेलियाचा राजा यंदा आपल्या दहाव्या वर्षात पदार्पण करत असून, युनायटेड इंडियन्स ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया (UIOSA) यांच्या आयोजनाखाली हा सोहळा होणार आहे.
२०२५ चा हा उत्सव भारताबाहेर झालेला सर्वात मोठा बाप्पांचा उत्सव ठरणार असून, दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया, न्यू साउथ वेल्स आणि क्विन्सलँड येथील भाविक व कलारसिकांना आकर्षित करणार आहे.
३० आणि ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या उत्सवात सुमारे १५ हजार भाविक व पाहुणे सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. २०१६ मध्ये मुंबईत खास तयार केलेल्या २१ फुटांच्या भव्य गणेशमूर्तीच्या आगमनाने या उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी भाविकांची संख्या वाढली असून, हा उत्सव आज ऑस्ट्रेलियातील सर्वात लोकप्रिय भारतीय सामाजिक-सांस्कृतिक सण बनला आहे.
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातून खास आणलेली पर्यावरणपूरक भव्य सजावट. पूर्णतः पुनर्नवीनीकरण होणाऱ्या कागदापासून (कार्डबोर्ड) तयार केलेली ही सजावट भारताबाहेरील सर्वात मोठी “इको-फ्रेंडली गणेश सजावट ठरणार आहे. श्रद्धा आणि संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचे भान ठेवण्याचा संदेश यामधून दिला जाणार आहे.
सुरुवातीपासूनच १५० स्वयंसेवक आणि २५ कार्यसंघ या उत्सवाच्या तयारीत झटत आहेत. मिरवणुकीत महाराष्ट्रातील परंपरागत ढोल-ताशांचा गजर होणार असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकही आनंदाने त्यात सहभागी होणार आहेत. नेहमीप्रमाणे, भक्तगण मोठ्या श्रद्धेने “गणेश पालखी” उचलून ॲडलेडच्या रस्त्यांवरून नेतील, ज्यातून भारतीय परंपरेचा संगम पाहायला मिळेल.
धार्मिक कार्यक्रमांत १०१ जोडपी “सत्यनारायण पूजन करणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जवळजवळ २०० मुले-मुली (विविध शाळा व विविध संस्कृतींमधून आलेली) संगीत, नृत्य व नाट्यकला सादर करतील. यामधून भारतीय परंपरेचा वारसा जागतिक पातळीवर मुलांना मार्गदर्शक ठरत आहे.
हा उत्सव सर्वांसाठी मोफत खुला असून दिवसभर भाविकांना महाप्रसाद (अन्न) व चहा दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा विशेष कार्यसंघ सकाळ-संध्याकाळ अविरत सेवा देणार आहे. ही निरपेक्ष सेवेची (सेवा वृत्तीची) विलक्षण उदाहरणे भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या सेवा” चे प्रत्यक्ष दर्शन घडवतात.
गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो धर्मभेद आणि जातीभेदाच्या पलीकडे जाणारा सोहळा आहे. भारतासारख्याच विविधतेने नटलेल्या ऑस्ट्रेलियात प्रत्येक धर्माचे आणि समाजाचे लोक समानतेने एकत्र येतात आणि हा सोहळा अधिक भव्य करण्यासाठी हातभार लावतात. त्यामुळे हा उत्सव एकता, सांस्कृतिक स्नेह आणि आध्यात्मिक मैत्रीचे प्रतीक ठरतो.
उत्सवाचे थेट प्रक्षेपण जगभर होणार असून, गेल्या वर्षी ६० हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेल्या या सोहळ्यास यंदा आणखी मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. एसबीएस ऑस्ट्रेलियाचा मीडिया या सोहळ्याचे विशेष कव्हरेज करणार आहे.