गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी घेतली आमदार संजय केळकर यांची भेट
ठाणे: सेवा रस्ता अंतर्भूत करून घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होणार आहे. यात बेसुमार वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी तर होणारच आहे, शिवाय स्थानिकांच्या दारातूनच वाहने वेगाने धावणार असल्याने अपघातांचा मोठा धोका संभवणार आहे. या भीतीने येथील गृहसंकुलांच्या १० असोसिएशनने आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन रुंदीकरणाविरुद्ध निवेदन दिले.
सेवा रस्ता रद्द करून मुख्य रस्त्याला जोडला तर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, सेवा रस्त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना सुरक्षित अंतर्गत प्रवासाची सुविधा मिळत होती. पण सेवा रस्ता मुख्य घोडबंदर मार्गाला जोडून रुंदीकरण केल्यास ही सुविधा मिळणार नाही. भरधाव वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढेल. सेवा रस्त्यावर दुकाने, शाळा, आस्थापना असून रुंदीकरणामुळे रस्ता त्यांच्या आस्थापनेपर्यंत जाऊन त्रासदायक ठरणार आहे
मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीवर हा उपाय हानिकारक आहे. मेट्रोचे काम काही काळ चालणार असून नंतर मुख्य रस्ता मोकळा होईल, असे मत रहिवाशांचे आहे. सेवा रस्त्याच्या अटीवर पालिकेने आस्थापनांना परवानग्या दिल्या. त्या रद्द करणार का? नागरिकांच्या जाहीर सूचना, आक्षेप न मागवता रुंदीकरणाचा निर्णय परस्पर घेतला गेला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
आमदार संजय केळकर यांनी या इराकरणाचे गांभीर्य ओळखून तसेच पुढाकार घेऊन एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि घोडबंदर येथील स्थानिकांची नुकतीच बैठक घेऊन चर्चा केली. रहिवाशांना रुंदीकरणाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होणार असेल तर ते योग्य नसून लोकहिताकरीता योजना राबवली पाहिजे, असे मत आ.केळकर यांनी मांडून अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही श्री.केळकर म्हणाले.