काशिमीरा वाहतूक पोलिसाला मारहाण

भाईंदर: काशिमीरा परिसरातील अमर पॅलेस नाका येथे दुचाकीस्वारांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना काशिमीरा नाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशिमीरा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी किरण ससाणे नेहमीप्रमाणे काशिमीरा नाका येथे वाहतूक नियमन करत होते. यावेळी एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या इसमाशी वाद घालून त्याला मारहाण केली. हे निदर्शनास आल्याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक यांनी पोलीस ससाणे त्याला थांबवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मनात ठेवून मारहाण करणाऱ्या राईन याने मोबाईलवरुन आपल्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी आलेल्या सात-आठ जणांनी वाहतूक पोलीस कर्मचारी ससाणे यांच्या शर्टची काॅलर पकडून पोलिसाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी उपस्थित असलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी मध्यस्थी करत आरोपीला पकडले.

​घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून युसुफ इस्राईल राईन,सरफराज राईन, नायब राईन, अब्दुला राईन इतर सात ते आठ इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला. संध्याकाळी उशिरापर्यंत चार हल्लेखोरांना काशिमीरा पोलिसांनी अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मीरा-भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.