हवा गुणवत्ता निर्देशांक २६९ वर
ठाणे : उन्हाच्या पाठोपाठ ठाण्यात प्रदूषणाचा देखील पारा वाढला आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक थेट २६९ वर पोहचला असल्याने आता श्वास घेणे ही कठीण झाले आहे. शहरात २५हून जास्त ठिकाणे हे प्रदूषणाचे हॉट स्पॉट ठरले आहेत.
झाडांची कत्तल, धूळ, राडारोडा, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले असताना प्रदूषणमुक्त ठाणे अशी घोषणा करणारी ठाणे महापालिका सपशेल नापास ठरली आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने उच्चांक गाठल्याची नोंद झाली आहे.
एकेकाळी तलावांमुळे आणि हिरवळीमुळे प्रसिद्ध असलेले ठाणे शहर आता जगातील अतिप्रदूषित शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे. ठाणे हे तलावांचे शहर असून शहरात वृक्षसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धुळ, धुराच्या व्याप्तीने शहरात वायु प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. ठाण्यात वायू प्रदूषणाची दिवाळीपासून अत्यंत वाईट परिस्थिती झाली असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
हवेची गुणवत्ता इतकी निकृष्ट आहे की जगण्यासाठी श्वास घेणे हेसुद्धा आता गुन्हा ठरू लागले आहे. जागतिक पातळीवर ठाण्याला नवा कीर्तिमान ‘किताब बहाल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत सातत्याने पुरावे देत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत असतानाही प्रशासन ढिम्म आहे. राजकीय नेते आपल्या राजकारणात गुंग आहेत. कोणालाच या गंभीर संकटाची पर्वा नाही. हजारो झाडे विकासकामांसाठी तोडली जात असल्याचे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी सांगितले.
प्रदूषित हवेचे हॉटस्पॉट
नितीन कंपनी, किसननगर नाका, शास्त्री नगर, बाळकुम, गावदेवी नाका, लोकमान्य नगर, विटावा, कोर्ट नाका, कापुरबावडी नाका, शिळफाटा, दिवा डम्पींग ग्राऊंड, जांभळी नाका, इंदिरा नगर, वर्तक नगर, ढोकाळी मार्केट, कासारवडवली मार्केट, कळवा भाजी मार्केट, मुंब्रा स्टेशन, दिवा स्टेशन, कोपरी राऊत शाळा, तीन हात नाका, सॅटीस नौपाडा आदी भाग हे हॉटस्पॉट ठरले आहेत.
प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. यामध्ये निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत चौकशी देखील सुरु आहे. दररोज हवेच्या गुणवत्तेचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरम्यान, शहराच्या प्रदूषणाचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे रोहित जोशी यांनी सांगितले.