भिवंडी: भिवंडी तालुक्यातील धामणगाव-कशिवली गावातील ग्रामस्थांना मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कशिवली गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात होते.
भिवंडी तालुक्यातील धामणगाव-कशिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कशिवली ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. या गावाजवळून मुंबई महापालिकेची पाईपलाईन जात होती. मुंबई महापालिकेने तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच कशिवलीलाही पाणीपुरवठा करावा, यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात १२ मे २०२१ रोजी पत्र देण्यात आले होते. तसेच मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आय. एस. चहल यांच्याबरोबर संवाद साधला होता. त्यानंतर याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
अखेर महापालिकेने धामणगाव कशिवली ग्रामपंचायतीला नुकतेच पत्र पाठवून नवीन तानसा जलवाहिनीवरुन ३२ मिमी व्यासाची जलजोडणी देऊन पाणीपुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
कशिवली येथील पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थ संदेश भोईर, ज्ञानेश्वर पाटील, यशवंत पाटील, सुंदर पाटील, किरण भोईर, जगन पाटील, अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी कपिल पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. त्यावेळी धामणगाव-कशिवली ग्रामस्थांच्या कायम पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांचीही उपस्थिती होती.