दिल्लीप्रमाणेच ठाणे शहरातील लॉज-`डॉरमेट्री’ही धोकादायक!

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांची लक्षवेधी सूचना

ठाणे : दिल्ली येथील बेकायदा हॉटेलला लागलेल्या आगीत २२ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हॉटेलप्रमाणेच ठाणे शहराबरोबरच कोपरी-चेंदणी परिसरातील अनेक बेकायदेशीर लॉज व डॉरमेट्री’ मध्ये धोकादायक परिस्थिती आहे, असा आरोप करीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना सादर केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल तपासणी करून कारवाईची मागणी केली आहे.

दिल्ली येथील मालवीयनगरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रेस्टॉरंटचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले. तेथे परदेशातील नागरिक राहत होते. या ठिकाणी रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर संपूर्ण हॉटेलला आग लागली. हॉटेलमध्ये दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना रस्त्यावर उड्या मारण्याची वेळ आली. हॉटेलमध्ये जाण्यासाठी अरुंद मार्ग, अपुरे व्हेंटिलेशन यामुळे आग भडकण्याबरोबरच निष्पाप नागरिकांचा बळी गेला, याकडे नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले.

नवी दिल्लीतील परिस्थितीप्रमाणेच ठाणे शहराच्या इतर भागांबरोबरच कोपरी व चेंदणी परिसरातही बेकायदा लॉज व `डॉरमेट्री’ उभारण्यात आल्या आहेत. जुन्या इमारतीतील फ्लॅट व जागा भाड्याने घेऊन `डॉरमेट्री’ सुरू झाल्या. काही लॉजमध्ये बेकायदेशीरपणे छोट्या खोल्या उभारून वेश्याव्यवसायाबरोबरच गैरप्रकार सुरू आहेत. या ठिकाणी उभारलेल्या लॉज व `डॉरमेट्री’मध्ये जाण्यासाठी एकच अरुंद रस्ता आहे. त्यामुळे भविष्यात आगीची दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची भीती आहे. या संदर्भात महासभेत चर्चा करून शहरातील सर्व लॉज व `डॉरमेट्री’ची तपासणी करून कडक कारवाई करावी. त्या ठिकाणी आवश्यक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना नसल्यास कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली आहे.