उकाड्याने घामाघूम, घामोळ्यांनी हैराण!

ठाण्यात कमाल तापमान ४२ अंशावर

ठाणे : ठाणे शहराचे यंदाचे कमाल तापमान ४२ अंशांवर पोहोचल्याने नागरिक उष्णतेने पुरते हैराण झाले आहेत. त्यातच अधूनमधून पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कायम असलेला उकाडा यामुळे घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाच्या एक-दोन सरी कोसळत असल्या तरी वातावरणातील उकाडा काही कमी झालेला नाही. उलट पाऊस पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना अधिक घाम येत आहे. सध्या मान, पाठ, छाती, काखा आणि हातांवर लालसर पुरळ, खाज, जळजळ आणि त्वचेची आग होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येत आहे. सतत घामाने ओले होणारे कपडे, उष्ण आणि दमट वातावरण तसेच त्वचेची अपुरी काळजी ही घामोळ्यांची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

​आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घामोळे ही सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. खाजविल्यामुळे त्वचेवर जखमा होऊन बॅक्टेरियल संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

​घामोळ्यांपासून बचावासाठी दिवसातून पुरेसे पाणी पिणे, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत आणि इतर द्रवपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शक्यतो शरीराला हवा खेळती राहील असे सुती व सैलसर कपडे वापरावेत. दिवसातून दोन वेळा अंघोळ करून त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. तसेच दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उष्णता आणि दमट वातावरणाचा हा दुहेरी फटका सध्या ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

​सध्या वाढलेल्या दमटपणामुळे घामोळे, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत. नागरिकांनी भरपूर पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे संतुलन राखावे. घामोळ्यांमुळे आलेले पुरळ खाजवणे टाळावे आणि त्रास वाढल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.