नवी मुंबई: मे महिन्याच्या अखेरीस कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपण्याच्या वाटेवर असताना बाजारात जुन्नर हापूस व केशर आंबा दाखल होण्यास सुरवात होते. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात सध्या जुन्नर आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली असून रोज सात ते आठ पिक अप गाड्या दाखल होत आहेत. पुढील काही दिवसांत आवक वाढणार असल्याची माहिती येथील फळ व्यापाऱ्यांनी दिली.
वाशीतील फळ बाजारात साधारण मार्च महिन्यापासून कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाला जोर पकडतो. यासोबतच दक्षिण भारतातील आंध्र आणि कर्नाटकमधील आंबा देखील दाखल होत असतो. फळ बाजारात कोकणातील उन्हाळी हापूस हंगाम संपताच जुन्नर हापूस दाखल होत असतो. यंदा अवकाळी पावसामुळे कोकणातील हापूस उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. जुन्नर हापूसला देखील अवकाळीची झळ बसली आहे. बाजारात मे अखेरीस जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र सध्या बाजारात कमी प्रमाणात जुन्नर हापूस दाखल होत असून जूनमध्ये आवक वाढून साधारण १५ ते २० जूनपर्यंत हंगाम राहणार आहे.
सध्या बाजारात जुन्नर हापूससह केशर आंबा दाखल होत आहे. बाजारात रोज जुन्नरहून आंब्याच्या सात ते आठ पिकअप गाड्या दाखल होत आहेत. जुन्नर हापूस दोन ते अडीच डझन पेटीला ४०० ते ७०० रुपये दर मिळत आहे तर जुन्नर केशर आंबा ३० ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे, अशी माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.