फेरीवाल्यांच्या गराड्यात गृहसंकुले कोंडली

कोट्यवधींच्या हफ्तेबाजीमुळे कारवाई शून्य-आ. संजय केळकर

ठाणे: शहरातील अनेक गृहसंकुले अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्याने या फेरीवाल्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली.

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवासी उपस्थित होते. लोक उपवन गृहसंकुलातील सुमारे ५०० रहिवाशांनी सह्यानिशी फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिले. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गराडा घातल्याने रहिवाशांना बाहेर पडणे मुश्किल झाल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहे. दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील पाच सोसायट्यांसाठी असलेला खाजगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी ग्रस्त झाला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना श्री.केळकर म्हणाले की, अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्याने इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती श्री.केळकर यांनी दिली.

बांदल चाळीसाठी पुढाकार घेणार-श्री.केळकर

रेल्वेच्या विकास कामासाठी रेल्वे लगतची बांदल चाळ पाडण्यात येणार आहे, त्यामुळे ५० कुटुंबे बाधित होणार आहेत. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पुढील आठवड्यात महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन ठोस नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

कार्यक्रमात मफतलाल कंपनीचे कामगारही उपस्थित होते. कामगारांना थकबाकी देण्याबाबतचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. जागा विक्रीची प्रक्रिया सुरू असून मिळालेल्या पैशांतून कामगारांची देणी दिली जात नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव आदी उपस्थित होते.