आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि २०१९ च्या स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड या दोन संघांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
इंग्लंड आणि न्यूझीलंडची २०२३ मध्ये एकदिवसीय कामगिरी
२०२३ मध्ये इंग्लंडने १२ एकदिवसीय सामने खेळले, त्यात सात विजय नोंदवले, तर न्यूझीलंडने २० सामने खेळले, ज्यात आठ विजय नोंदवले. जेव्हा हे दोन संघं चार वेळा आमनेसामने आले, तेव्हा इंग्लंडने तीन वेळा न्यूझीलंडवर मात केली.
फलंदाजीत इंग्लंडच्या डेविड मलान (५९१ धावा) आणि जोस बटलर (५४८ धावा) यांनी यावर्षी ७४ आणि ६१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. न्यूझीलंडसाठी, डॅरिल मिचेल (६५२ धावा), विल यंग (५७८ धावा), आणि डेव्हन कॉनवे (४४९ धावा) यांनी ४३, ४४ आणि ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
गोलंदाजांमध्ये, लेगस्पिनर आदिल रशीद हा इंग्लंडसाठी सात सामन्यांमध्ये १५ विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे, तर किवीससाठी, वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने १० एकदिवसीय सामन्यांमध्ये १४ विकेट्स पटकावल्या आहेत.
कसे आहे विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्रदर्शन?
इंग्लंडने १९७५ ते २०१९ दरम्यान ८३ विश्वचषक सामने खेळले आहेत. ८३ पैकी ४८ सामने इंग्लंडने जिंकले आहेत आणि त्यांचे यश ५८ % आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने ८९ सामने खेळले, ५४ जिंकले आणि ६१% यश प्राप्त केले. हे दोन संघं १० वेळा आमने-सामने आले आहेत, ज्या मध्ये न्यूझीलंडने पाच तर इंग्लंडने चार जिंकले असून आणि एक सामना टाय झाला आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडचं प्रदर्शन
भारताविरुद्धचा सामना पावसामुळे न झाल्याने इंग्लंडला फक्त एकच सराव सामना खेळता आला. त्यात इंग्लंडने बांगलादेशला चार विकेट्सने पराभूत केले (डी एल एस पद्धत). इंग्लंडच्या विपरीत, न्यूझीलंडला मैदानावर चांगला वेळ मिळाला. त्यांनी त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकले. पहिले पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केलं आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी (डी एल एस पद्धत) पराभव केला.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे तपशील
संघ
इंग्लंडः जोस बटलर (क), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (क), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग .
खेळण्याची परिस्थिती
अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. दुसऱ्या डावात दव भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. स्टेडियममध्ये सहा काळ्या मातीच्या खेळपट्ट्या आणि पाच लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत. काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांपेक्षा लाल मातीच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करतात, तर काळ्या मातीच्या खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना अधिक मदत करतात.
हवामान
भरपूर सूर्यप्रकाशासह हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शुन्य टक्के शक्यता राहील.
कुठल्या खिळाडूंवर लक्ष्य ठेवायचे?
इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर महत्त्वाचा असेल. यष्टिरक्षक-फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये बटलरने ५२ च्या सरासरीने आणि ११२ च्या स्ट्राइक रेटने ४१८ धावा केल्या आहेत. त्याच्याकडून आघाडीचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे आणि या रोमांचक स्पर्धेत त्याच्या नेतृत्व कौशल्याची चाचणी घेतली जाईल. गोलंदाजांमध्ये लेग स्पिनर आदिल रशीद महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याच्या धूर्तपणाने तो फिरकी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या भारतीय परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. त्याने शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडसाठी अष्टपैलू डॅरिल मिचेल संघाच्या फलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण असेल. तो आक्रमक फलंदाजी करू शकतो आणि डावाच्या मधल्या टप्प्यात चेंडूने उपयुक्त षटके देऊ शकतो. त्याच्या फलंदाजीसाठी अधिक ओळखल्या जाणार्या, उजव्या हाताच्या या खेळाडूने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने आणि ९७ च्या स्ट्राइक रेटने २५१ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये भारतीय परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज, ट्रेंट बोल्ट, नवीन चेंडूसह त्याची जादू करणे अपेक्षित आहे. तो जगातील पाचव्या क्रमांकाच्या गोलंदाज आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात चांगले प्रदर्शन केले, ज्यात त्याने पहिल्याच षटकात विकेट पटकावली. त्याच्या शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ५ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)