भाईंदर: ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, परिसरात सिगारेट पाकिटे, दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचल्याने दुर्गप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व असून, दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र, स्वच्छतेदरम्यान आढळलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, कंडोम कव्हर्स आणि अस्वच्छ वस्तूंमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
शिवप्रेमींकडून प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. किल्ल्याच्या परिसरात दिवे बंद असल्याने अंधार, अस्वच्छता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने हे ठिकाण तरुणांच्या अयोग्य वर्तनाचे केंद्र बनत असल्याचीही चर्चा आहे. जंजिरे धारावी किल्ला जतन समितीने यापूर्वीही मीरा-भाईंदर महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वारसा संवर्धन विभागाकडे किल्ल्यावर सुरक्षारक्षक नेमणे, वीजपुरवठा सुरू करणे यासारख्या मागण्या केल्या होत्या. मात्र त्या मागण्यांकडे प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्षच होत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त जंजिरे धारावी किल्ला जतन समितीने इशारा दिला आहे की, “लवकरच जंजिरे धारावी किल्ल्याच्या संरक्षण, स्वच्छता आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, तर मोठे आंदोलन छेडले जाईल.” जंजिरे धारावी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने किल्ल्याचे संवर्धन, स्वच्छता आणि प्रकाशयोजनेची उपाययोजना करावी, अशी मागणी किल्लाप्रेमी व शिवभक्तांकडून जोर धरू लागली आहे.