शिवसेनेत अंतर्गत वाद; तरीही राष्ट्रवादीची परीक्षा!

कळवा प्रभागात सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष

आनंद कांबळे/ठाणे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा प्रभाग समितीला ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी फोडल्याने शिवसेनेचे निष्ठावंत विरुद्ध राष्ट्रवादीतील फुटलेला गट असा सामना होण्याची शक्यता आगामी महापालिका निवडणुकीत असून आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा यावेळी कस लागणार आहे.

कळवा प्रभाग समितीमध्ये १६ सदस्य होते. या प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. नऊ राष्ट्रवादीचे तर सात सेनेचे सदस्य होते. राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा हा बालेकिल्ला असून ठामपा हद्दीत कळवा-मुंब्रा या दोन प्रभाग समितीव्यतिरिक्त अन्य प्रभाग समित्यांमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता होती, त्यामुळे ही प्रभाग समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षे प्रयत्न करत आहे.

वन विभागाच्या जागेवरील झोपडपट्टी, भूमिपुत्र आणि इतर शहरातून स्थायिक झालेले मतदार असलेल्या या प्रभाग समितीमध्ये, खारीगाव, विटावा, पारसिक, मूळ कळवा, शिवाजी नगर, मनिषानगर, वाघोबानगर भास्करनगर, पौडपाडा, मोफतलाल झोपडपट्टी असे बहुभाषिक मतदार या भागात राहतात. आ जितेंद्र आव्हाड हे या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात तर श्रीकांत शिंदे हे या भागाचे खासदार आहेत. दोघांच्यामधून विस्तव जात नाही, त्यामुळे अगामी महापालिका निवडणुकीत हे दोघेही ताकद पणाला लावणार आहेत. आ. आव्हाड यांनी या भागात नागरी सुविधांची कामे करून जनमानसात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे तर शिवसेनेने या भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी आणला आहे. माजी विरोधी पक्षनेता नजीब मुल्ला हे आव्हाड यांच्या विरोधात लढाई लढत असून त्यांच्या जोडीला आत्ता शिंदे सेनेचे सैनिक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यावेळी या प्रभाग समितीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत तुल्यबळ सामना होणार आहे.

कळवा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने आ.आव्हाड यांचे खास शिलेदार निवडणुकीच्या तोंडावर फोडून आ.आव्हाड यांना दणका दिला होता. या सर्वांना पुन्हा निवडणुकीत उतरवण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.

शिंदे सेनेत असलेले निष्ठावंत बिथरले आहेत. ज्यांच्या विरोधात अनेक वर्षे संघर्ष केला, त्यांचे काम करावे लागणार असल्याने ते चिंतेत आहेत. त्यांचे भविष्य पणाला लागले आहे, त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात? पक्षात आलेल्यांच्या विरोधात बंड करतात की त्यांच्याबरोबर निष्ठेने काम करतात, यावर सेनेचे या भागातील भवितव्य अवलंबून आहे.

या भागाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची खरी कसोटी लागणार असून मनी आणि मसल पॉवरच्या विरोधात लढताना या भागातील विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या तोलामोलाचा उमेदवार शोधण्याची मोठी जबाबदारी डॉ. आव्हाड यांच्यावर आहे. कळवा प्रभाग समितीवरील सत्ता ते कायम ठेवतात की शिवसेना मागील अनेक वर्षाचे त्यांचे कळवा ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात हे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात समजणार आहे.