नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये शिवसेनेने भाजपकडे युतीचा प्रस्ताव मांडला त्या घटनेला 24 तास उलटले नाही तोच शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर उमटला असून या प्रकरणी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी भाजपामध्ये आणि शिवसेनेत खटके उडत असल्याचे पहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या तेजश्री करंजुले-पाटील यांची निवड झाली. शिवसेना 27, राष्ट्रवादी चार आणि एक अपक्ष असे 32 संख्याबळ तर सत्ताधारी भाजपा 14, काँग्रेसचे 12 एक अपक्ष असे 27 बलाबल आहे.
निवडणूक होण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही मित्र पक्षांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. आणि वाद जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला होत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला अधिकृत मान्यता दिली. बहुमत असलेल्या शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालानंतरही केंद्र आणि राज्याप्रमाणे अंबरनाथ शहरात शिवसेना-भाजपची युती व्हावी असा प्रस्ताव शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख आदींनी भाजपसमोर ठेवला होता.
मात्र युतीचा प्रस्ताव मांडताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे. नगरसेवक वाळेकर यांच्या विधानामुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.
शहर विकासासाठी निवडणुकीतील मतभेद विसरून शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी भूमिका शिवसेनेतर्फे मांडण्यात आली. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव मांडण्यात आला असा खळबळजनक दावा नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केला.
युतीच्या प्रस्तावाबाबत शहरातील अनेक शिवसेना नगरसेवकांनी संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. सेनेच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रस्ताव मांडायला हवा होता, त्यांचे विचार ऐकायला हवे होते, मात्र मोजक्या नगरसेवकांना घाईघाईने बोलवून युतीचा प्रस्ताव मांडला, युतीबाबत वरिष्ठांचा जो आदेश येईल तो अंतिम असेल, युती झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार युतीचा निर्णय मान्य असेल, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते जाणून घेणे गरजेचे होते. सर्वांची एकत्रित बैठक घेऊन युतीचा प्रस्ताव मांडायला हवा, भाजप सोबत युती व्हायलाच हवी, मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव मांडला तो मान्य नसल्याचा टोला नगरसेवक वाळेकर यांनी लगावला.