खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

कल्याण: कल्याण-मलंगगड रोडवरील नेवाळी येथील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या कल्याण पूर्वेतील चार मित्रांपैकी एका २९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल आहेर असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील मार्तंड निवास, गणेशवाडी परिसरात राहणारे चार मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास नेवाळी येथील खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अतुल आहेर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. अखेर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून नागरिकांनी धोकादायक खदाणी व तलाव परिसरात पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.