भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून नवे दर लागू
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. रेल्वेने नव्या दरांची अंमलबजावणी येत्या 26 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वेने उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत. जनरल तिकीटाचे दर 215 किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर एक पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉन एसीसाठी दोन पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी दोन पैसे अधिक मोजावे लागतील. रेल्वेने प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडली आहे. प्रवास भाडे वाढवल्याने रेल्वेला या वर्षात 600 कोटी रुपये मिळणार आहेत. 500 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 रुपये अधिक द्यावे लागतील.
गेल्या 10 वर्षात रेल्वेने नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्याने खर्च एक लाख 15 हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील 60 हजार कोटींनी वाढला आहे. 2024-25 मधील रेल्वे चालवण्याचा खर्च दोन लाख 63 हजार कोटी रुपये झाला आहे.
रेल्वेने वाढता मनुष्यबळ खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे प्रवास भाडे कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या प्रयत्नांमुळे सुरक्षा वाढेल आणि रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढेल.  जगातील रेल्वे मालवाहतुकीत भारताचा दुसरा क्रमांक असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.