उल्हासनगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख राजू माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उल्हासनगरमधील या प्रवेशात विभाग संघटक निरंजन दास, महिला शहर संघटक जया तेजी, उपशहर संघटक कुसुम माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. हा प्रवेश सोहळा उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. या घडामोडीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही घटना निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.