सत्तेच्या पटावर कळवा, मुंब्रा, दिवा ठरणार वजीर

४७ नगरसेवक गेमचेंजरच्या भूमिकेत

ठाणे: ठाणे महापालिकेसाठी गुरुवारी मतदान आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. पण आतापासूनच युती आणि आघाड्यांमध्ये सत्तेची समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. असे असले तरी कळवा, मुंब्रा आणि दिवा या तीन प्रभागातील ४७ नगरसेवक कुणाच्या पारड्यात पडणार आहेत, यावरच झेंडा कुणाचा फडकणार हे ठरणार आहे. त्यामुळे हे नगरसेवकच खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहेत.

कळवा, मुंब्रा आणि दिवा या तिन्ही प्रभाग समित्यांमधून तब्बल ४७ नगरसेवक पालिकेच्या सभागृहात निवडून जाणार आहेत. कळव्यात शिवसेना शिंदे गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या प्रभागासह मुंब्य्रात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. दिव्याचा गड राखण्याचे आव्हान शिवसेना शिंदे गटासमोर असून येथे महाविकास आघाडी त्यांना जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे या तिन्ही प्रभाग समित्यांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक पदांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये ३३ पैकी १२ प्रभाग हे कळवा, मुंब्रा आणि दिवा या तीन प्रभाग समित्यांमध्ये आहेत. कळव्यातील ९, २३, २४ आणि २५ या प्रभागांतून १६ नगरसेवक निवडून येणार आहेत. मुंब्य्रातील २६, ३०, ३१, ३२ आणि ३३ या प्रभागातूनही सर्वाधिक २० नगरसेवक निवडून येणार आहेत. तर दिव्यातील २७, २८ प्रभागातून प्रत्येकी चार आणि २९ प्रभागातून तीन असे ११ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे निवडून येणार्‍या ४७ नगरसेवकांचे बळ कुणाच्या पारड्यात पडते हे पहावे लागणार आहे.

या तीन प्रभाग समित्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने मिशन कळवा-मुंब्रा राबवून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा हा किल्ला खिळखिळा करण्याची रणनिती खेळली. येथील नगरसेवक फोडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शिंदे आणि आव्हाड यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली असताना या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजिब मुल्लाही ताकदीने उतरले आहेत. त्यामुळे कळव्यामध्ये थेट शिवसेना शिंदे गट तर मुंब्य्रात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसमाने आली आहे. दिव्यात शिवसेना शिंदे गटाचा गड मजबूत आहे. पण महाविकास आघाडीने येथे मनसेला ताकद दिली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही आव्हान आहे.

कळव्यातील प्रभगा क्रमांक ९ मध्ये चारही पॅनलवर शिवसेना शिंदे गटाने आपले शिलेदार उभे केले आहेत. त्यापैकी पॅनल अ, क मध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असा तिरंगी सामना आहे. पॅनल ब मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. पॅनल क, ड मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमनेसामाने आहेत. राष्ट्रीवादीचा हा गड आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

महायुतीने या भागात पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे. या प्रभाग समितीतून सर्वाधिक २० नगरसेवक निवडून येणार आहेत. मुस्लिम बहूल परिसर असल्यामुळे एमआयएमनेही येथे ताकद लावली आहे. २० जागांसाठी येथे तब्बल ११६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी श.प. गटाचे २०, राष्ट्रवादी अ.प.गटाचे २० उमेदवार आमनेसामने आहेत. काँग्रेसनेही येथे १२, एमआयएमने ११, भाजपने ६, सपाने ३, आययुएमएलने ४, अपक्ष ३२ असे उमेदवार रिंगणात आहेत. गेल्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादीला क्रमांक दोनचा पक्ष बनवण्यात मुंब्य्राने महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा मुंब्य्राची साथ मिळावी यासाठी आव्हाडांनी येथे तळ ठोकला आहे. याला नजिब मुल्लाही तोडीस आव्हान देत असल्याने येथील निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे.

दिव्यातील ११ जागांसाठी ६५ उमेदवार रणांगणात उतरले आहेत. वास्तविक दिवा शिवसेनेचा गड बनला आहे. २०१७ मध्ये मिळालेल्या यशानंतर शिवसेना शिंदे गटाने येथून १० उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये माजी उपमहापौरांचा आणि त्यांच्या मुलीचाही समावेश आहे. तर भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा दिली आहे. दिव्यात महाविकास आघाडी विस्कळीत झाली आहे. तीन प्रभागांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे विरोधात लढत आहेत. असे असले तरी उपमहापौर रमांकात मढवी यांच्यासमोर ठाकरे गटाने रोहिदास मुंडे यांचे आव्हान उभे केले आहे. तर शिंदेच्या दोन शिलेदारांसमोर मनसेचे उमेदवार एकाकही लढत देत आहेत.