उल्हासनगरमध्ये नोटांनी भरलेली बॅग हस्तगत

उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षातून एका अपक्ष उमेदवाराने जवळपास ५० लाख रुपयांची रोख रक्कम पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात नागरिकांची गर्दी जमली होती. ही रोकड मतदारांना वाटप करण्यासाठी जात असतानाच आपण पकडली असल्याचा आरोप निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले नारायण (नरेश) गायकवाड यांनी सांगितले.

याबाबत नारायण उर्फ नरेश गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले ही रिक्षा कॅम्प नंबर -३ परिसरातून जात असताना मी तिचा पाठलाग केला. त्यावेळी त्या रिक्षात दोन ते तीन जण बसलेले होते. ही रिक्षा सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात येताच विठ्ठलवाडी पोलीस चौकीसमोर ही रिक्षा मी थांबवली. त्यावेळी त्या रिक्षातील अज्ञात व्यक्ती पळून गेले. रिक्षामध्ये पाहणी केली असता त्या रिक्षामध्ये एक बॅग आढळून आली. होती. मी त्वरित रिक्षा चालकाला पकडून विठ्ठलवाडी पोलीस चौकीत स्वाधीन केले. पोलिसांकरवी त्या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगमध्ये जवळपास ५० लाख रुपयाची रोख रक्कम होती, असा दावा नारायण उर्फ नरेश गायकवाड यांनी केला.

ही रोकड भरारी पथकाने ताब्यात घेतली असून. रिक्षा चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.