ठाणे : मुंबईतील खाजगी बसगाड्यांची घुसखोरी रोखण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या विभागात महापालिकेने पार्किंग धोरण लागू करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी अर्थसंकल्पीय चर्चेच्यावेळी केली. त्याचबरोबर प्रभाग क्र. ५ मधील विविध प्रश्नांचा वेध घेऊन शहरातील सर्व रस्त्यांवरील गतीरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची सूचना केली.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. ठाणे महापालिकेने पार्किंग धोरण ठरविले नसल्यामुळे शहरातील मोकळ्या रस्त्यांवर मुंबईतील खाजगी बसची पार्किंग होत आहे. पोखरण क्र. १, २ बरोबरच घोडबंदर रोडवरील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दररोज रात्री बसच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. महापालिकेने पार्किंग धोरण लागू केल्यास महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. मात्र, या पार्किंगमधून स्थानिक नागरिकांच्या मोटारी व छोट्या वाहनांना वगळावे, अशी मागणी जयश्री डेव्हिड यांनी केली.
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जयश्री डेव्हिड यांनी प्रभागातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोकणीपाडा येथे पाईपलाईन, जुना म्हाडा-स्वामी विवेकानंद नगर येथे बोअरवेल, कोकणीपाडा शाळेची दुरुस्ती, पवारनगर-स्वामी विवेकानंद नगर विभागात जादा सफाई कर्मचारी, प्रभागात कचरा उचलण्यासाठी टॅंगो व्हॅन आदी प्रश्नांवर वेगाने कार्यवाही करण्याची विनंती केली. गार्डन एन्क्लेव्ह येथील कुत्र्यांना पकडण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील बेवारस वाहनांवर नोटीसा बजाविल्यानंतर ती जप्त करून ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, याकडे जयश्री डेव्हिड यांनी लक्ष वेधले. स्वच्छ भारत अभियान योजनेत ८४ कुटुंबांना स्वच्छतागृहे उभारण्यासाठी अर्ज मंजूर करण्यात आलेले नाही. मात्र, त्यांना अनुदान मिळालेले नाही. विशेष बाब म्हणून या कुटुंबांना अनुदान देण्याबाबत तरतूद करावी, अशी मागणी जयश्री डेव्हिड यांनी केली.
पवार नगर, गावंड बाग, उपवन-येऊर मार्गावर १० मिनिटांनी `टीएमटी’ची बससेवा, वसंत विहार नाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दररोज वाहतूक नियंत्रणासाठी दोन वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी केली.