बेकायदेशीर मद्याविक्रीचे कंबरडे मोडले! २५६ आरोपी जेरबंद!!

दोन महिन्यांत ४४० गुन्ह्यांची नोंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात छुप्या मार्गाने अवैध दारूची विक्री होत असली तरी या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी अवैध दारुचा व्यवसाय करणा-या २५६ आरोपींना अटक करण्यात यश आले तर केवळ दोन महिन्यांच्या अवधीत ४४० गुन्ह्यांची नोंद ठाणे उत्पादन शुल्क विभागात झाली आहे.

अवैध दारुचा व्यवसाय करणा-यांचे कंबरडे मोडण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग अहोरात्र नजर ठेवून आहे. हातभट्टी दारूबरोबर परराज्यातील दारू विक्रीला बंदी असूनही ठाणे जिल्ह्यात बेकायदा दारूचा व्यवसाय करणा-यांविरोधात ठाणे उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिम राबवली.
गेल्या दोन महिन्यात हातभट्टी दारू, रसायन, विदेशी मद्य आणि १२ वाहने आदी मुद्देमाल पकडुन सुमारे एक कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खाडी आणि सागर व डोंगरी जंगलाने व्यापलेल्या ठाणे जिल्ह्यात छुप्या मार्गाने अवैध दारूची विक्री होत आहे. अशा दारू विक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग २४ तास नजर ठेवून असल्यामुळे गावठी दारू आणि दीव-दमण-गोवा या राज्यांमधून येणा-या मद्यावर एक्साईजचे अधिकारी व त्यांचे सहकारी पाळत ठेवतात. त्यांच्यामुळेच अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. ठाणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात एक कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती डॉ. निलेश सांगडे ( जिल्हा अधीक्षक, उत्पादन शुल्क ठाणे) यांनी दिली.

जिल्ह्यात मद्य विक्रीचे प्रमाण वाढले असून याचा गैरफायदा काही मद्य विक्रेते घेत आहेत. ते शासनाचा महसूल देत नसल्यामुळे त्यांच्यावर विभागाची पाळत आहे. विभागाची जिल्ह्यात ठाणे ( ए बी सी डी एफ), डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आदी ठिकाणी पथके तैनात आहेत.

गेल्या दोन महिन्यात २५३ वारस तर १८८ बेवारस गुन्ह्यांची नोद केली आहे.

ठाण्याभोवती खाडी किनारा आणि जंगल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार केली जाते. याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संबंधित ठिकाणी जातात. मात्र काही वेळा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. परंतु, अधिकारी, कर्मचारी अवैध दारू तयार करण्याच्या जागा उद्धवस्त करुन त्यांचा माल जप्त करतात व त्यांना हा बेकायदेशीर व्यवसाय करु देत नाहीत.

एप्रिल आणि मेमध्ये सात हजार लिटर हातभट्टी दारू, दोन लाख ९० हजार लिटर रसायन, ३५५ लिटर देशी मद्य, १३५ लिटर विदेशी मद्य, ३६३ लिटर बियर, ३७५ लिटर ताडी, ३२० किलो काळा गूळ, दुस-या राज्यातील ७३ लिटर मद्य, १२ वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे, असे डॉ. निलेश सांगडे यांनी सांगितले.