सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका दणक्यात, पाकिस्तान पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. एकूण चौथ्यांदा ते सेमीफायनलपर्यंत पोहोचले आहेत आणि सलग तिसऱ्यांदा त्यांनी हा टप्पा गाठला आहे.

या विश्वचषक मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात चार वेळचे विजेते इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेला धक्कादायक 10 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन करत सलग चार विजयांची नोंद केली आणि स्पर्धेत आपली छाप पाडली.

भारत आणि बांगलादेश यांनी त्यांना तगडा सामना दिला, पण दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामन्यांत पराभवाच्या उंबरठ्यावरून विजय खेचून आणला. केवळ 25 वर्षांची नादिन दी क्लर्क या दोन्ही सामन्यात चमकली आणि ‘फिनिशर’ची भूमिका बजावत त्या विजयांत सिंहाचा वाटा उचलला.

आता अजून दोन साखळी सामने बाकी असताना, प्रश्न असा आहे — दक्षिण आफ्रिका काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार का, की तोच प्लेइंग XI घेऊन मैदानात उतरणार?

50 षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका अद्याप पोहोचलेली नाही, त्यामुळे कर्णधार लॉरा वूलव्हार्ड्ट आपल्या संघाला सज्ज आणि लयीत ठेवण्यास प्राधान्य देणार, यात शंका नाही. प्रयोगांपेक्षा खेळाडूंना जास्तीत जास्त सामना सराव देणे हेच त्यांचे लक्ष्य असू शकेल — कारण त्यांचे ध्येय विश्वचषक जिंकण्याचे आहे.

दक्षिण आफ्रिका सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे. पण पाकिस्तानचा संघ अजूनही स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, गेल्या महिन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. त्या सामन्यात नाश्रा संधूने सहा विकेट्स घेतल्या होत्या, तर सिद्रा अमीनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता.

पाकिस्तान पुन्हा एकदा उलथापालथ घडवून आणणार का, की प्रोटीजचा विजयाचा रथ असाच पुढे धावणार?

आमने-सामने
एकूण: पाकिस्तान – 6, दक्षिण आफ्रिका – 23
विश्वचषकात: पाकिस्तान – 0, दक्षिण आफ्रिका – 4
आयसीसी क्रमवारीत: पाकिस्तान – 8, दक्षिण आफ्रिका – 4

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 21 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: आर प्रेमदासा स्टेडियम
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार