‘ऍशेस’ची आग पेटणार इंदोरमध्ये!

ऍशेस प्रतिस्पर्धी. अकरा विश्वविजेतेपदे. 2022चे फायनलिस्ट. 2025चे सेमीफायनलिस्ट. शतकवीर कर्णधार. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल दोन संघ — महिला क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणारे हेच दोन संघ: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड.

या विश्वचषकात आजवर दोन्ही संघ अक्षरशः अजिंक्य ठरले आहेत. प्रत्येक सामन्यात त्यांनी प्रभावी कामगिरी करत वर्चस्व गाजवले आहे. प्रत्येक वेळी वेगळा खेळाडू सामनावीर ठरत असल्याने संघांची ताकद आणि खोली स्पष्ट दिसते. अनुशासन, सातत्य आणि प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्याची तीव्र जिद्द — या सगळ्यांचा परिपाक म्हणजे त्यांचे वर्चस्व.

इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांनी यापूर्वीच यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर मोहिमेची सुरुवात करत न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 326 धावा बचावल्या, तर इंग्लंडने भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवून चार धावांनी थरारक विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाची तारांकित अष्टपैलू ऍशली गार्डनर आणि इंग्लंडची माजी कर्णधार हेदर नाईट या दोघीही आत्मविश्वासाने पुन्हा त्याच मैदानावर उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इथे शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनीही या मैदानावर चांगली कामगिरी केली होती, पण यावेळी त्यांची खरी कसोटी लागणार आहे — अशा फलंदाजांविरुद्ध, ज्या सहजपणे स्वीप, स्लॉग स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळू शकतात.

दोन्ही संघांनी इंदोरमध्ये प्रथम फलंदाजी करत सामना जिंकलेला असल्याने, ऑस्ट्रेलियाची स्टॅन्ड-इन कर्णधार ताहलिया मॅकग्रा (ऍलिसा हिली दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध खेळणार नाही) आणि इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट दोघीही पुन्हा एकदा फलंदाजीची निवड करतील अशी शक्यता आहे. धावफलकावर धावा उभ्या करून दबाव निर्माण करण्याची त्यांची रणनीती कायम राहील.

दोन्ही बाजूंनी ताकदीचे आणि संतुलित संघ आमनेसामने येत असल्याने, आजचा टॉस सामन्याचे भवितव्य ठरवू शकतो — हा “चॅम्पियन्सचा संघर्ष” ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.

 

आमने-सामने

एकूण: ऑस्ट्रेलिया – 61, इंग्लंड – 24

विश्वचषकात: ऑस्ट्रेलिया – 13, इंग्लंड – 4

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: ऑस्ट्रेलिया – 1, इंग्लंड – 2

 

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 22 ऑक्टोबर, 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार