दक्षिण आफ्रिका विजयाच्या मार्गावर, बांगलादेशपुढे अस्तित्वाची लढाई

भारताविरुद्ध व्हायझॅगमध्ये विजयाचा झेंडा फडकावल्यानंतर दक्षिण आफ्रिका आत्मविश्वासाच्या शिखरावर आहे. 252 धावांचा पाठलाग करताना, शेवटच्या चार षटकांत 41 धावांची गरज होती. सात गडी बाद झालेले. तरीही दक्षिण आफ्रिकेने भारताच्या तोंडचा घास पळवून अविस्मरणीय विजय मिळवला. नाडिन डी क्लार्कने अप्रतिम फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला आणि अब्जावधी भारतीयांच्या आशांवर पाणी सोडले. त्या खेळीत तिने दडपणाखाली दाखवलेली चिकाटी विशेष होती.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीतील अपयशानंतर लॉरा वुलव्हार्टच्या संघाने जोरदार पुनरागमन केले आहे आणि आता सलग तिसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सलामीवीर वुलव्हार्ट फॉर्ममध्ये परतली आहे. गोलंदाजी आक्रमण धारदार दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेने निर्णायक क्षणी संयम आणि जिंकण्याची जिद्द दाखवली आहे.

दुसरीकडे, बांगलादेशचा संघ संघर्ष करत आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून त्यांनी विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. मात्र नंतर इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून सलग दोन पराभव स्वीकारले. त्यांचा गोलंदाजी आक्रमण चांगली कामगिरी बजावत आहे. परंतु फलंदाजीमध्ये सातत्याचा अभाव आहे. कर्णधार निगर सुलताना जोतीकडून अपेक्षा आहे की तिने फलंदाजीत पुढाकार घ्यावा आणि इतरांनी तिला योग्य साथ द्यावी.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘फेव्हरेट्स’ म्हणून उतरतील. त्यांचा फॉर्म चांगला आहे. व्हायझॅगमधील परिस्थितीची त्यांना चांगली ओळख झाली आहे. पण क्रिकेटमध्ये काहीच निश्चित नसतं. बांगलादेशसाठी ही संधी आहे, पुनरागमन करण्याची.

तर मग सोमवारच्या या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड सुरु राहील की बांगलादेश आश्चर्याचा धक्का देईल?

आमने-सामने (BOX MADHE)
एकूण: बांगलादेश – 3, दक्षिण आफ्रिका – 18
विश्वचषकात: बांगलादेश – 0, दक्षिण आफ्रिका – 1
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: बांगलादेश – 7, दक्षिण आफ्रिका – 4

संघ

बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा आक्तर, फर्गाना हक, रुब्या हैदर झेलिक, शार्मिन आक्तर सुप्ता, शोभना मोस्तरी, रितु मोनी, शॉर्ना आक्तर, फहीमा खातून, रबिया खान, मारुफा आक्तर, फरीहा इस्लाम त्रिस्ना, शांजिदा आक्तर मागला, निशिता आक्तर निशी, सुमैया आक्तर

दक्षिण आफ्रिका: लॉरा वुलव्हार्ट (कर्णधार), आयाबोंगा खाका, क्लोइ ट्रायॉन, नाडिन डी क्लार्क, मारिझान काप, ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अ‍ॅनरी डर्क्सन, अ‍ॅनेक बौश, मासाबाता क्लास, सुने लिस, कराबो मेसो (यष्टीरक्षक), तुमि सेखुखुने, नोंडुमिसो शांगासे

कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल

लॉरा वुलव्हार्ट: दक्षिण आफ्रिकेची कर्णधार भारताविरुद्ध व्हायझॅगमध्ये खेळलेल्या संघर्षपूर्ण 70 धावांच्या खेळीमुळे चर्चेत आहे — आणि त्याच मैदानावर तिचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. सध्या ती उत्तम फॉर्ममध्ये असून योग्य वेळी तिची लय सापडलेली दिसते.

नॉनकुलुलेको म्लाबा: या विश्वचषकात डावखुऱ्यांचा प्रभाव लक्षणीय ठरत आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज म्लाबाने आतापर्यंत 6 विकेट्स घेतले असून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतील ती एक प्रमुख शस्त्र बनली आहे.

मारुफा आक्तर: डावाची सुरुवात करणाऱ्या या उजव्या हाताच्या माध्यमगती गोलंदाजाने पॉवरप्लेमध्ये प्रभाव टाकला आहे. तिच्या 5 विकेट्सपैकी 4 पहिले 10 षटकांतच आले आहेत.

निगर सुलताना जोती: बांगलादेशची कर्णधार अद्याप या विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करू शकलेली नाही. पण तिचा अनुभव लक्षात घेता, ती संघाच्या फलंदाजीत प्रमुख भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 13 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम्
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार