नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. प्रचाराला अवघे नऊ दिवस उरले असून प्रभागात आपली छाप दिसावी म्हणून अनेक उमेदवार गर्दी जमवत आहेत. यासाठी नाका कामगारांना रॅली, सभांमध्ये सहभागी करून घेतले जात असल्याने या कामगारांना आता सुगीचे दिवस आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. असे असले तरी बहुतांश उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे. तर एकाच प्रभागात सर्वांसोबत चांगले संबंध असल्याने अनेक कार्यकर्ते प्रचारापासून दोन हात लांब आहेत. त्यामुळे प्रचाराला गर्दी जमवताना उमेदवारांची दमछाक होत आहे. ही दमछाक लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी आता नाका कामगारांची गरज भासू लागली आहे. प्रचाराची पत्रके वाटणे, फलक व होर्डिंग लावणे, रॅलीतील गर्दी वाढविणे, घोषणा देणे आदी कामांसाठी बहुतांशी उमेदवारांची भिस्त नाका कामगारांवर असल्याचे दिसून येत आहे. यात प्रचाराच्या रॅलीसाठी महिला कामगारांना अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. प्रचार कामात सहभागी होणाऱ्या पुरुष कामगाराला दिवसाला किमान ५०० ते ६०० तर महिलांना देखील ५०० ते ६०० रुपये शिवाय नाष्टा व प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी काही कामगार कंत्राटदारच नाका कामगार आणि नेते यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावताना दिसत आहेत. त्यामुळे प्रचारासाठी कामगारांची मागणी पाहता या कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.