जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

ठाणे: कळवा रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणत्याही पोलिसाला गंभीर दुखापत झाली नाही.

कळवा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून बसले होते. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी धडक मोहीम राबवली. कारवाईदरम्यान फेरीवाल्यांचे साहित्य, वजनकाटा यासह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. यावर संतापलेल्या फेरीवाल्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी ड्युटी संपवून निघालेल्या साध्या वेशातील जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पण फेरीवाल्यांनी त्यांच्या गाठीतही अडथळा आणत धक्काबुक्की सुरू केली.

यावेळी काही फेरीवाल्यांनी पोलिसांना चापट्याही मारल्याची माहिती प्रवाशांनी दिली. इतकेच नव्हे, तर बाजूला पडलेल्या काचेचा तुकडा उचलून पोलिसांना भोसकण्याचा प्रयत्नही केल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण प्रकार प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार दाखल न झाल्याने गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील अशा घटनांमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.