अंबरनाथला मिळणार वाढीव ९० एमएलडी पाणी

नालंबी येथील २५८ कोटींच्या योजनेला गती

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या संपुष्टात येणार असून वर्षभरापासून धीम्या गतीने सुरु असलेल्या नालंबी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला अखेर गती देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

पश्चिम भागातील नालंबी डोंगराच्या परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनाऱ्यालगत शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. आज शुक्रवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नालंबी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली.

शुद्धीकरण होईल त्या वनविभागाच्या जागेचा प्रश्न देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला असल्याचे आमदार किणीकर यांनी सांगितले. जवळपास २५८ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना असल्याची माहिती किणीकर यांनी दिली.

राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही योजना असून या ठिकाणी दोन जलकुंभ उभारण्यात येतील. या ठिकाणाहून पाणी उचलून नालंबी येथील वनविभागाच्या जागेवर शुद्धीकरण करून तीन मोठ्या जल वाहिन्यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात पूर्व-पश्चिम आणि ऑर्डनन्स परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा होईल. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे, येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होऊन अंबरनाथकारांना २४ तास पाणी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहोत असे असा विश्वास आमदार किणीकर यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राबविण्यात आलेल्या महत्वकांक्षी योजनांपैकी ही पाणीपुरवठा योजना असून येत्या काळात लवकरात लवकर काम कसे पूर्ण होईल, यासाठी आमदार किणीकर यांनी आदेश दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांची तहान भागवण्यासाठी राबवलेली आणि पुढील ५० वर्षांची ही महत्वपूर्ण योजना असून लवकरच शहराची पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण होईल, या योजनेमुळे जवळपास ९० एमएलडी पाणी शहराला मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर, सुभाष साळुंखे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.