वाहतूक बदलामुळे तीन दिवस कोंडीची शक्यता
ठाणे: नेहमीच वाहतूक कोंडीत घुसमटणाऱ्या घोडबंदर मार्गावर उद्यापासून तीन दिवस वाहतूक बदल करण्यात आल्याने ठाणेकरांचे या मार्गावर हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ८ ते १० मेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. परिणामी, ब्रह्मांड, मानपाडा, कापुरबावडी तसेच घोडबंदर रोड परिसरात वाहनांच्या रांगांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुल्लाबाग बस डेपोजवळ उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलावर आरपीएस-पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या माध्यमातून गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम ८ मे रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून सुरू होणार असून १० मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.
या काळात घोडबंदर रोडवरील काही महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने पर्यायी मार्गांवर अतिरिक्त वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विकेंडच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच ब्रह्मांड सिग्नलकडून कापुरबावडीकडे जाणारा मार्ग बंद राहणार असल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घालावा लागणार आहे.
मानपाडा उड्डाणपूलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा चौक तसेच कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे पर्यायी व्यवस्था केली आहे. तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांना टिकुजीनी वाडीमार्गे वळविण्यात येणार आहे.
जड आणि अवजड वाहनांनी या कालावधीत घोडबंदर रोड टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.