अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी नोटीसा

सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची सेनेची मागणी

अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी नगरपालिका प्रशासनाने दुकानदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. शिवसेनेने या प्रकाराला विरोध दर्शवला असून सभागृहात याविषयी चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सिंधी गल्लीतील दुकानदारांना २३ एप्रिल रोजी नोटीस बजावली आहे. कल्याण-बदलापूर राज्य महामार्गापासून रेल्वे स्टेशनकडे जाणारा १२ मीटर विकास योजना रस्त्याचे संपूर्ण रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना ही नोटीस बजावण्यात आली असून १५ दिवसांत मालकीचे हक्काचे कागदपत्र सादर करा अन्यथा अनधिकृत बांधकाम समजून कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला आहे.

या नोटीसमध्ये नगराध्यक्षांच्या कार्यालयात झालेली बैठक आणि मुख्याधिकारी यांच्या मंजूर टिपणीचा संदर्भ देण्यात आला आहे. मात्र यावरून शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्तारुंदीकरण बाबतचा विषय चर्चेसाठी न घेता व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी म्हटले आहे. तसेच व्यापाऱ्यांना नोटीस दिली ती जागा पालिकेची असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येते. अशावेळी व्यापारीवर्गाला टीडीआर देण्याचे सांगितले असून व्यापाऱ्यांची दिशाभूल करणे चुकीचे असल्याचे नगरसेवक वाळेकर यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

व्यापाऱ्यांवर बळजबरीने दबाव आणून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध करण्यात येईल, इशारा नगरसेवक वाळेकर यांनी दिला आहे. रस्ता रुंदीकरण करण्यासाठी नोटीस द्यायची असल्यास सर्वसाधारण सभेत विषय घेऊन निविदा काढणे, कार्यादेश होणे आवश्यक असते, त्यानंतर नोटीस काढावी लागते. मात्र तसे झाले नाही शहरातील अतिक्रमण काढणे, रस्ते रुंदीकरणासाठी शिवसेनेचा विरोध नाही, त्यासाठी प्रशासनास जरुर सहकार्य राहील, मात्र सर्वसाधारण सभेत चर्चा न होताच व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात. नगराध्यक्ष यांच्या दालनात विषय घेऊन, मुख्याधिकारी टिपणी काढून जर व्यापाऱ्यांना नोटीस काढत असतील तर सर्वपक्षीय नगरसेवकांची तुम्हाला गरज वाटत नाही का, संबंधित विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा घडवून आणावी, सर्व नगरसेवकांनी संगितले तर सर्वानुमते रस्तारुंदीकरण विषय मंजूर करू, असे मत नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी स्पष्ट केले.