जखमी गोविंदांसाठी सोलारिस हॉस्पिटलतर्फे मोफत रुग्णवाहिका

ठाणे : थरांच्या स्पर्धेत अनेक गोविदांना दुखापतीचा आणि अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशावेळी तत्काळ वैद्यकीय सेवा देणे फार गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून ठाणे घोडबंदर मार्ग येथील मेंदू आणि मणक्याच्या आजारांवर अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या सोलारीस हॉस्पिटलतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोपचार देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे.

या सेवेअंतर्गत गोविंदा पथकातील जखमी गोविदांना प्रथमोपचार व पुढील उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. या रुग्णवाहिकेत डॉक्टर, परिचारीका व वैद्यकीय मदतणीस यांचा समावेश असुन या सेवेचा लाभ घेण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा या वेळेत ०२२-४००४४००१ /०२२- ४००४४००३ या क्रमांकावर संपर्क साधावा. दहीहंडी हा उत्साहाचा सण आहे.

उत्साहाच्या भरात थरावर थर रचले जातील मात्र त्या थरावरून कोसळताना आपल्या मणक्यांना, कमरेला अथवा शरीरातील सांध्यांना दुखापत होणार नाही याची काळजी प्रत्येकानी घेतली पाहिजे, हा खेळ तरुणांना आकर्षित करणारा, सळसळत्या तारुण्याला आव्हान देणारा असला तरीही तो सुरक्षेचे भान राखून खेळायला हवा. मणक्याला व मेंदूला होणाऱ्या जबर दुखापतींमध्ये अनेकवेळा कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते म्हणूनच अशा गोविंदांवर तात्काळ उपचार गरजेचे असतात असे मत सोलारिस हॉस्पिटलचे संचालक व मेंदूविकारतज्ञ व शल्यचिकित्सक डॉ.अमित ऐवळे यांनी दिला आहे.