ठाणे : ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकूम जकात नाका येथे साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण १५ लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
गुरुवार ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती साई जलाराम प्रतिष्ठानचे सल्लागार, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिली. पुढील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानसही संजय भोईर यांनी व्यक्त केला.
बाळकूम जकात नाका येथे मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदाचे उत्सवाचे २३ वे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. साई जलाराम दहीहंडीच्या या सोहळ्याच्या आयोजनासाठी मा.शिक्षण मंडळ सदस्या उषा भोईर, मा.नगरसेवक भूषण भोईर तसेच ठाणे शहर युवासेना उपाध्यक्ष विकेश भोईर आदींचा सहभाग आहे. यंदा मुंबई-ठाण्यासाठी एक दहीहंडी, महिलांसाठी दहीहंडी आणि बाळकूम ग्रामस्थांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या येथे उभारल्या जाणार आहेत. नऊ थरांसाठी १ लाख ५१ हजारांचे रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर पाच ते आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकुण १५ लाखांची रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक गोविंदांना तसेच महिलावर्गासाठी आणि उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.