कल्याण-डोंबिवलीत महायुतीची घोडदौड
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीतील शिवसेना आणि भाजपने बिनविरोध विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. बुधवारी भाजपच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या होत्या आज गुरुवारी त्यात आणखी दोन उमेदवारांची भर पडली. या घोडदौडीत शिवसेनाही मागे राहिली नसून आज शिंदे गटाचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे तीन तर प्रभाग क्र. 28 मधून हर्षल मोरे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
या विजयामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली. तर येत्या शुक्रवारी इतर काही प्रभागातही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता मोरे यांनी वर्तविली आहे. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
यावेळी शिवसैनिकांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेसमोर जल्लोष केला. यावेळी आमदार राजेश मोरे, बिनविरोध उमेदवार रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पॅनल क्रमांक 27 अ मधून मंदा पाटील आणि पॅनल क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.