वाशीमध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज बाद

९५६ नामनिर्देशन अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध

नवी मुंबई: नवी मुंबईत वाशी प्रभाग क्रमांक १७ अ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे या प्रभागात आता शिवसेना उमेदवार व जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे पारडे जड झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, वैध व अवैध अर्जांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. संपूर्ण महापालिका हद्दीत एकूण ९५६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यापैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत.

या छाननी प्रक्रियेत वाशी विभागातून एकमेव नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वाशी विभागात दाखल झालेल्या १०२ अर्जांपैकी १०१ अर्ज वैध ठरले असून फक्त एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा अवैध ठरलेला अर्ज प्रभाग क्रमांक १७-अ मधील भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांचा आहे.नामनिर्देशन अर्ज बाद झाल्यामुळे प्रभाग १७-अ मधील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलले असून, याचा थेट फायदा शिवसेनेचे उमेदवार व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि त्यांच्या पॅनेलला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबईत मतदानाआधीच भाजपला पहिला झटका बसला आहे. असे असले तरी शिवसेने माजी नगरसेवक हरिश्चंद्र भोईर यांचा मुलगा दर्शन भोईर यांचे तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यामुळे भाजपाने देखील दर्शन भोईर यांचा प्रवेश करवून घेत त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करून पडलेल्या जखमेवर काही अंशी मलम लावला.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक करिता एकूण ९५६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यापैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. यात नेरूळ विभागात सर्वाधिक २८ अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल ३९ अर्ज बाद झाले आहेत. याच्या तुलनेत वाशी विभागात अत्यंत काटेकोर तयारीमुळे आणि अचूक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अवघा एकच अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट होते. नामनिर्देशन छाननीनंतर आता २ तारखेच्या माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत अंतिम निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.