एपीएमसीमधील फळ मार्केट निर्यात इमारतीत आग

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ मार्केट आवारातील निर्यात इमारतीतील तळ मजल्यावर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने या आगीत कुठलीही जीवित हानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीमुळे येथील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाशीतील एपीएमसी फळ बाजारात झालेले कागदी पुठ्ठे, लाकडी पेट्यांचे अतिक्रमण यामुळे या ठिकाणी एखादी आगीची घटना घडल्यास आग विझविताना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी येतात. याबाबत वाशी अग्निशमन दलाने एपीएमएसी प्रशासनाला वारंवार पत्र देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही नोव्हेंबर २०२२ मध्ये येथील कागदी पुठ्ठे व लाकडी खोक्यांना आग लागून २० ते २५ गाळे आगीच्याभक्ष्यस्थानी गेले होते. या आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने देखील एक समिती नेमली होती. त्यात देखील बाजार आवारातील अतिक्रमणावर ठपका ठेवला होता. समितीने असा ठपका ठेऊन देखील बाजार प्रशासनाने अग्निशामक उपाययोजनांबाबत उदासीन धोरण अवलंबले.

सोमवार ५ जानेवारी रोजी देखील या ठिकाणी निर्यात भवन इमारतीच्या तळ मजल्यावर आगीची घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान उडालेली एक ठिणगी तळ मजल्यावरील दुकानांमध्ये साठवून ठेवलेल्या प्लास्टिक कॅरटवर पडल्याने आग प्रचंड भडकली.
आगीची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आग वेळीच नियंत्रणात आणल्याने या आगीत कुठलीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. मात्र सदर आगीमुळे येथील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या इमारतीत अग्निशामक त्रुटी आढळून आल्या आहेत. कागदी पुठ्ठे व प्लास्टिक क्रेटचे अतिक्रमण दिसून आले. याबाबत एपीएमसी प्रशासनाला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी रोहन कोकाटे यांनी दिली.