अखेर सुभाषनगर-गांधीनगर एसआरए प्रकल्पाला गती

आमदार संजय केळकर यांची एसआरए कार्यालयात संयुक्त बैठक

ठाणे : गेली अनेक वर्षे सुभाषनगर गांधीनगर येथील रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अन्यायग्रस्त रहिवाशांना न्याय देण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी एसआरए कार्यालयात अधिकारी, रहिवासी आणि विकासकाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शेकडो रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. आता या प्रकल्पाला गती मिळणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

सुभाषनगर-गांधीनगर येथील एसआरए प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला असून १५००हून अधिक कुटुंबे हवालदिल झाली आहेत. विकासकाने रहिवाशांची घरे रिकामी केली, परंतु आठ आठ वर्षे अनेकांना भाडेच देण्यात आलेले नाही. शिवाय पात्र अपात्र यादीतही घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. येथील रहिवाशांनी श्री. केळकर यांच्याकडे धाव घेऊन व्यथा मांडल्यानंतर त्यांनी पाठपुरावा सुरू केला. या पार्श्वभूमीवर श्री. केळकर यांनी सोमवारी एसआरए कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडेरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक विकास पाटील, माधुरी मेटांगे, एसआरएचे अधिकारी राजकुमार पवार उपस्थित होते. बैठकीत श्री.केळकर यांनी रहिवाशांची बाजू मांडताना विकासक आणि एसआरए प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला.

बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ज्या रहिवाशांची भाडी थकली आहेत, त्यांची अंतिम यादी तीन महिन्यांत तयार करण्यात येऊन भाडी अदा करण्यात येतील. एका आठवड्यात पहिल्या इमारतीचे काम सुरू करण्यात येईल आणि एक महिन्यानंतर उर्वरित तीन इमारतींचे काम अखंडपणे सुरू होईल. याबाबत विकासक अपयशी ठरल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

माध्यमांशी बोलताना श्री. केळकर म्हणाले, शहरात अनेक एसआरए प्रकल्प सुरू असून काही प्रकल्प सुरळीत तर अनेक ठिकाणी विकासकांकडून रहिवाशांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे. या विकासकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी विधी मंडळात आग्रहही धरला आहे. रहिवाशांना दमदाटी करणाऱ्या आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बैठकीत केली आहे. महारेरा,किंवा एसआरए कार्यालयाने विकासकांसाठी काम न करता रहिवाशांना केंद्रीभूत मानून कारभार करायला हवा, असेही श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.