१ एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार

मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फास्टॅग टोल पास आता महाग होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे. आधी हा पास तीन हजार रुपयांना मिळायचा. 1 एप्रिल पासून हा पास 3,075 रुपयांना मिळणार आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. दरवाढीमागे ऑपरेशन आणि देखभाल खर्च वाढ हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

हा पास प्रामुख्याने खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) लागू आहे. या पासमध्ये एक वर्षाची वैधता किंवा 200 टोल प्रवास (जे आधी पूर्ण होईल) अशी सुविधा मिळते. यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक सोपा आणि जलद होतो. हा पास ऑनलाइन सहज उपलब्ध आहे. ‘Rajmarg Yatra’ अ‍ॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.