सत्ताधारी सेना नगरसेवकाकडून आरोपाने खळबळ
ठाणे: ठाणे शहरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी हप्ता द्यावा लागत असून त्याचा व्यवहार महिन्याला सुमारे ५०लाख इतका असल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकाने महासभेत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्या नगरसेवकाने दिला आहे.
महापालिका पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणार असून त्याकरिता एक कोटी ४५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेला आला होता. त्यावेळी फेरीवाल्यांनी पदपथ आडून ठेवल्याने नागरिकांना रस्त्याने चालता येत नसल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून फेरीवाल्यांची दादागिरी वाढली असल्याचेही या नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंद करण्यात आला, त्यावेळी या रस्त्याने बस जाणे अपेक्षित होते, परंतु या रस्त्यावर दुतर्फा फेरीवाले बसत असल्याने रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. ठाण्यातील रस्त्यावर कुर्ला, गोवंडी, चेंबूर, भायखळा, विक्रोळी, कल्याण या भागातील फेरीवाले ठाण्याच्या रस्त्यांवर गावगुंडांना हप्ता देऊन व्यवसाय करतात, असा आरोप सर्वच नगरसेवकांनी केला. गावगुंड हप्ते घेतात आणि नगरसेवक बदनाम होतात, असा आरोप देखिल माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करताना स्थानिक फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी देखिल करण्यात आली.
दिवा भागातील फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेने जोरदार मोहीम उघडल्याने या भागातील फेरीवाले गायब झाले आहेत तर कळवा ते कर्जत या रेल्वे स्थानकांच्या आवारात फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे, परंतु ठाणे रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटरच्या अंतरात एकही फेरीवाला बसत नसल्याबद्दल भाजपचे संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. ठाण्यातील वर्तकनगर भागातील फेरीवाल्यांच्या विरोधात राकेश शिंदे यांनी स्वतः मोहीम राबवल्याने त्या भागातील फेरीवाले गायब झाल्याचे यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी काही नगरसेवकांच्या आशिर्वादामुळे फेरीवाले रस्ता अडवून बसतात, असा थेट आरोप करून फेरीवाल्यांकडून मिळणाऱ्या हप्त्याचा हिशोब सुमारे ५० लाख इतका व्यवसाय असतो. नगरसेवकांनी फेरीवाल्यांना विरोध केला तर फेरीवाले रस्त्यावर बसणारच नाहीत, असा दावा त्यांनी केला. नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे तसेच अधिकाऱ्यांनी देखिल कणखर भूमिका घेऊन फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी श्री. रेपाळे यांनी केली.
महापालिका मुख्य बाजारपेठ येथे कायमस्वरूपी अतिक्रमण विभागाची गाडी उभी करणार असून नगरसेवकांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी तातडीने केली जाईल, असे आश्वासन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिले.
या चर्चेत भाजपाच्या मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, मनोहर डुंबरे, अमित सरय्या, शिवसेनेचे पवन कदम, राकेश शिंदे, राजेश मोरे, मालती पाटील, शैलेश पाटील, रमाकांत मढवी, साक्षी मढवी, सुधीर कोकाटे बाबाजी पाटील, विमल भोईर आदींनी चर्चेत भाग घेतला.