मुंबई : राज्यातील विद्युत मीटर असलेल्या रिक्षा, टॅक्सींच्या चालकांना आता मराठी भाषेचे प्राथमिक आणि व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार, तपासणीच्या वेळी एखाद्या रिक्षा, टॅक्सी चालकाला मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास त्याला मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.
राज्यातील टॅक्सी, रिक्षा आणि ॲपवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीटरच्या कॅब चालकांना आता मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करून ही अट स्पष्ट केली आहे. नव्या नियमानुसार, प्रवाशांशी संवाद साधता यावा यासाठी संबंधित चालकांना मराठी भाषा समजणे आणि बोलता येणे आवश्यक आहे. या मुदतीत मराठीचे आवश्यक ज्ञान न मिळवल्यास चालकाची अनुज्ञाप्ती तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन त्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, विद्युत मीटर असलेल्या टॅक्सीच्या परवान्याचे नूतनीकरण करताना परवानाधारकाला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे प्राधिकरणाला समाधानकारकपणे सिद्ध करावे लागणार आहे.
या नियमाची अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून संबंधित परमिटधारकांनाही मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच ॲपवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीटरच्या कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करतानाही परमिटधारकाला मराठीचे ज्ञान असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
राज्य शासनाने अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य केले आहे. या निर्णयानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना मोठा प्रतिसाद मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले असून, त्यात मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. सध्या राज्यभरातील १४० हून अधिक केंद्रांवर वर्ग सुरू असून चालकांची मोठी उपस्थिती आहे. आतापर्यंत राज्यभरातील सुमारे एक लाखांहून अधिक चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आले आहे.