अटी शर्तीनंतरच प्रकल्पाचे काम सुरू
पालघर : देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेले वाढवण बंदर तयार करण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांवर कोणतीही गदा येऊ नये, त्यांना पारंपारिक पद्धतीने मच्छीमारी करता यावी अशा अटी टाकून वाढवण बंदराचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच वाढवण बंदरामुळे जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधीत स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथील जाहीर सभेत प्रतिपादन केले.
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे व इतर नगरसेवकांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर येथे उपस्थित होते. या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, इतर आमदार व मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात नवीन प्रकल्पाची विविध कामे हाती घेतली असल्यामुळे हा सर्वात विकसित जिल्हा म्हणून तयार होत आहे. पालघर जिल्ह्याची जिल्हा निर्मितीनंतर अवस्था बिकट होती. मात्र आमच्या कारकीर्दीत जिल्हा मुख्यालयाच्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल सुरू केली आणि आता राज्यातील सर्वात चांगली जिल्ह्याची कार्यालय ही पालघर जिल्ह्यातली असल्याचे त्यांनी यावेळी गौरवोद्गार केले.
मुख्यमंत्री यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण कोणावरही टीकाटिप्पणी करण्याकरिता, कोणाला उत्तर देण्याकरिता, कोणाचीही उमेदवारी काढण्याकरिता आलो नसून पंतप्रधानांच्या विकासाचा संदेश घेऊन विकासाची वाटचाल करण्याकरिता येथे आलो असल्याचे यावेळी मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. १७ मिनिटे सुरू असलेल्या त्यांच्या भाषणात त्यांनी विरोधी पक्षावर एकही राजकीय भाष्य केले नाही.
पालघरचा विकास झपाट्याने होत असून झेंडा लावण्याकरिता किंवा खुर्ची राखण्याकरिता आम्हाला नगरपरिषद नको तर नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करिता नगरपरिषद हाती घ्यायची असल्याचे मुख्यमंत्री यांनी नगराध्यक्ष पदाकरिता कैलास म्हात्रे यांना विजयी करण्याच्या उद्देशाने जाहीर केले. तसेच सुनियोजित अशा प्रकारचे पालघर तयार करायचे आहेत त्यामुळे आराखड्यावर काम करणारा व्यक्ती नगराध्यक्षपदी निवडून आला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पालघरचा महानगरपालिका करण्याचा विचार
वेगाने होत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी पालघर नगर परिषदेवर विकासाचा भार वाढत असल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच पालघरचे महापालिकेमध्ये रूपांतर करावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली. असे केल्यास पालघर जिल्ह्याला सर्व सोयी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगाराची निर्मिती पालघर जिल्ह्यात तयार होणार आहे. मात्र यावेळी देखील आपण रोजगारामध्ये प्रथम प्राधान्य स्थानिक भूमिपुत्रांना मिळाले पाहिजे, तरुण-तरुणींना मिळाले पाहिजे मग इतरांना अशी अट टाकली होती. याकरिता स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणे सुरू झाले असून प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज लवकरच पालघर जिल्ह्यात तयार होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी प्रतिपादन केले.
मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन नुकतेच वर्षपूर्ती झाली असून बहुमत मिळाले होते. त्यावेळी अनेकांना लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याची भीती वाटत होती. मात्र देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. पंतप्रधान यांनी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे ध्येय समोर ठेवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.