कोपरीतील वीज तक्रार केंद्र पश्चिमेला हलवले

ठाणे: ठाणे (पूर्व) येथील कोपरी विभागातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वीज देयक तक्रार निवारण केंद्र तीन दशके नागरिकांसाठी अत्यंत सोयीचे ठिकाण ठरले होते. मात्र अलीकडेच हे केंद्र अचानक रहेजा गार्डन, ठाणे (पश्चिम) येथे स्थलांतरित करण्यात आले असून, कोपरी विभागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सांगितले की, “३० वर्षांपासून कार्यरत असलेले हे केंद्र सर्वसामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोठी सुविधा होती. आता ठाणे पश्चिमेला जाण्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम या तिन्हींचा ताण येतो. अनेक वृद्धांना फक्त तक्रार देण्यासाठी किंवा बिलाबाबत विचारण्यासाठी इतकं अंतर पार करावे लागते.”

कोपरी परिसरात राहणारे नागरिक दर महिन्याला वीजबिल, मीटर वाचन, तक्रार निवारण, वीजजोडणी व नामांतरण यांसारख्या कामांसाठी नियमितपणे या केंद्रात येत असत. मात्र केंद्र हलवल्यामुळे त्यांना ठाणे पश्चिमेतल्या गजबजलेल्या भागात जावे लागते, ज्यामुळे वाहतूक कोंडी, प्रवासाचा खर्च आणि वेळेचे नियोजन या सर्व समस्या उभ्या राहिल्या आहेत. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर प्रशासनाने नागरिकांच्या सोयीचा विचार करून हे केंद्र पुन्हा कोपरीत सुरू केलं नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.”

स्थानिक पातळीवर या विषयावर चांगलीच चर्चा रंगली असून, शिवसेनेच्या पुढाकारामुळे पुन्हा तक्रार निवारण केंद्र कोपरीत येईल असा विश्वास स्थानिकांना आहे. या संदर्भात महावितरण केंद्राशी संपर्क साधला असता, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र ठाणे पश्चिम येथे स्थलांतरित झाले असले तरी, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन, तक्रार निवारणासाठी कर्मचारी ठेवले जाणार आहेत.

कोपरी विभागातील हजारो वीजग्राहकांना या निर्णयामुळे मोठा त्रास होत आहे. हे केंद्र हलवण्यामागे कोणताही तर्क दिसत नाही. नागरिकांच्या हिताचा विचार करून ते पूर्वीच्या ठिकाणीच सुरू करण्यात यावं, हीच जनतेची मागणी आहे, असे शिवसेना विभाग प्रमुख संतोष बोडके यांनी सांगितले.