बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या गीताला १५० वर्षे पूर्ण
ठाणे: बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला आज, ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशभरात सामुहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिक वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला.
सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘वंदे मातरम् ‘ या गीतास ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्याची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्याने झाली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिले.
त्यानंतर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे समूह गान करण्यात आले. या स्मरणोत्सवाबाबतच्या माहितीसाठी https://vandemataram150.in/ हे संकेतस्थळ संस्कृती मंत्रालयाने विकसित केले आहे. त्यावर जास्तीत जास्त नागरिकांना वंदे मातरम गातानाचा व्हिडिओ अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.