ठामपा आयुक्तांचे निर्देश
ठाणे: ठाणे शहरात ८६ अतिधोकादायक इमारती असून त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४९ इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडूंन जीवितहानी होऊ नये यासाठी या इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात तसेच या इमारतींची वीज आणि पाणी जोडणीही तोडण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
पावसाळा पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत, रिक्त करायच्या अती धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे आदींबाबत चर्चा झाली.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अती धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिकांचा निवास आहे. या ४९ अती धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. या इमारतींमधील नागरिकांनी तत्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अती धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. अनधिकृत अती धोकादायक इमारतींमधील कुटुंबांची शाळांमध्ये तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यांनी तेवढ्या कालावधीत नवीन जागेचा शोध घ्यावा, असेही आयुक्तांनी नमूद केले.
अती धोकादायक (सी 1 वर्ग) आणि धोकादायक (सी 2 a वर्ग) या दोन्ही प्रकारातील इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा तत्काळ खंडित करावा. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यात अजिबात दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
…शंका असेल तिथे व्हीजेटीआय किंवा आयआयटी यांची मदत घ्यावी
ठाणे महापालिका क्षेत्रात धोकादायक परंतु रचनात्मक दुरुस्ती केल्यावर निवास योग्य होतील अशा १९२ इमारती आहेत. त्या इमारती रिक्त करून त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. या इमारतींमधील कुटुंबांना या दुरुस्ती काळापुरती नजिकच्या शाळांमधील संक्रमण शिबिरात तात्पुरती पर्यायी निवास व्यवस्था देण्यात येईल. या इमारतीची दुरुस्ती संबंधितांनी ताबडतोब करून घ्यावी, असे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
अती धोकादायक आणि धोकादायक इमारतींशिवाय जुन्या इमारतींमध्ये इमारत रिकामी न करता दुरुस्ती करणे (२३७४) आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे (१६४७) अशा स्वरूपाच्या इमारती शहरात आहेत. त्यांनीही तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे उपस्थित होते.
अती धोकादायक इमारती (सी 1 वर्ग)
प्रभाग रिक्त इमा. व्याप्त इमा.
कळवा ०० ०२
मुंब्रा ०४ ०२
दिवा ०० ००
नौपाडा १८ २०
कोपरी ०३ १३
वागळे इस्टेट ०० ००
लोकमान्य नगर-
सावरकर नगर ०५ ००
वर्तकनगर ०२ ०१
माजीवडा मानपाडा ०४ ०५
उथळसर ०१ ०६
एकूण ३७ ४९
धोकादायक इमारती (सी 2 a वर्ग)
प्रभाग इमारती
कळवा ११
मुंब्रा १००
दिवा नौपाडा-कोपरी २६
वागळे इस्टेट ०३
लोकमान्य नगर-
सावरकर नगर १४
वर्तक नगर १७
माजीवडा-मानपाडा ११
उथळसर ०८
एकूण १९२