* भाजपा-शिवसेना महायुतीच्या ‘निर्धारनाम्या’चे प्रकाशन
* मिनी क्लस्टर योजना राबवण्याचा संकल्प
* ठाण्यात ‘अब की बार १०० पार’चा नारा
ठाणे : ठाण्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सक्षम पाणी पुरवठा यंत्रणा आणि योग्य नियोजन याबरोबरच कचरामुक्त ठाणे शहर आणि मिनी क्लस्टर योजना राबविण्याचे वचन शिवसेना-भाजप महायुतीच्या निर्धारनाम्यात देण्यात आले आहे. ठाणे महापालिका निवडणूक -२०२६ करीता भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयात मंगळवार ६ जानेवारी रोजी महायुतीच्या ‘ठाणे निर्धारनामा’चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर, भाजपचे ठाणे निवडणुक प्रभारी आ. निरंजन डावखरे, शिवसेना (शिंदे गट) राज्य सचिव राम रेपाळे, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, सुजय पतकी, प्रवक्ते सागर भदे आणि मनाली गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.सहस्रबुद्धे म्हणाले, केंद्र सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेली कामे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याकडे दिलेलं विशेष लक्ष आणि ठाणेकरांच्या मनामध्ये भाजप-शिवसेना महायुतीने मिळवलेले स्थान, या शिदोरीवर ह्या महापालिका निवडणुकीत महायुती अब की बार १०० पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आमदार केळकर, शिवसेनेचे राम रेपाळे यांनी देखील ठाणे महापालिकेवर पुन:श्च भगवा फडकणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
भाजप- शिवसेना महायुतीने ठाणे शहरासाठी ५४ कलमी ‘निर्धारनामा’ जाहीर केला आहे. ज्यात शहरात मिनी क्लस्टर योजना राबविण्यासह ठाणेकरांसाठी २४ तास पाणी पुरवठा, नवीन गृहसंकुलांसाठी पाण्याच्या पुनर्वापराचे धोरण जाहीर केले आहे. तसेच, दर तीन महिन्यांनी प्रभागसभा घेऊन प्रभागनिहाय खर्चाचा डिजिटल बोर्ड लावला जाईल. स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक ठाणे साकारण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून तलावांचे सुशोभीकरण व पर्यटन सुविधा विकसित केल्या जातील. कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याबरोबरच शहरात भूमिगत कचरा कुंड्या बसवण्यात येतील. त्याचप्रमाणे दुबार नालेसफाईसह मलनि:स्सारण ऑडिट व कृती आराखडा केला जाईल. शहरासाठी कॅन्सर हॉस्पिटल, एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय, महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी व्हॅन्स, ठाणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने सहा ते आठ भव्य पार्क, नाट्यगृहे, फिल्म फेस्टिव्हल, स्ट्रीट आर्ट, संगीत महोत्सव, डिजिटल ग्रंथालये आदीसह नवीन स्टेडियम उभारून आयपीएल व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जाईल. कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख डिजिटल शिक्षणाबरोबरच महापालिका शाळांमध्ये अर्ध-इंग्रजी पद्धती, सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासह टीएमटी सेवेचा दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार असून प्रत्येक मेट्रो स्टेशनपासून परिसरात जाण्यासाठी मिनी बसचे नेटवर्क उपलब्ध केले जाईल. आधुनिक पार्किंग स्टेशन आणि ठाणे शहरात इंटर्नल रिंग मेट्रो बनविण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.
ठाणेकरांना उत्तम पायाभूत सुविधा देण्याकरीता शहरातील १९७ कि.मी. रस्त्यांचे सखोल ऑडिट करून,१० वर्षे टिकतील असे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना प्राधान्य असणारे महापालिकेचे स्वतंत्र पदपथ धोरण तसेच फेरीवाला धोरण लागू करणार असून जुन्या इमारतींच्या पुनर्विकास मंजुरीसाठी एक खिडकी योजनाही राबवण्यात येणार असल्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला आहे.
ठाणेकरांच्या हक्काचे धरण उभारण्यासाठी प्रयत्न
उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्यामुळे मेट्रोसह अनेक विकासकामांना विलंब झाल्याचा आरोप करून आ. संजय केळकर यांनी ठाणे शहराला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष असल्याचा दावा केला. तसेच प्रत्येक ठाणेकर नागरीकाचा हॅपिनेस इन्डेक्स वाढवण्याचा संकल्प बोलून दाखविला. पाणी पुरवठ्याबाबत मास्टर प्लॅन बनवला असून त्या अंतर्गत बुजलेली तळी आणि विहीरी पुनर्जीवित केली जातील. विशेषतः महापालिकेचे स्वतःचे धरण उभारण्यासाठी रचनात्मक योजना तयार केली आहे, तरी देखील धरण होईल तेव्हा होईल, तोपर्यंत पाण्याचे इतर स्त्रोत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आ. केळकर म्हणाले.