अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना-भाजपने मैत्रीपूर्ण निवडणूक लढवून सर्वात जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणले. त्यामुळे केंद्र आणि राज्यात असलेल्या युतीप्रमाणे शहरात भाजप आणि शिवसेनेची पारंपरीक युती होणार असे बोलले जात होते. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा देखील सुरु होती, मात्र भाजपने सत्तेसाठी काँग्रेससोबत युती केली, असा आरोप आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अ.प) सोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य आणि देशात महायुती म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत शहरात भाजप, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. यामध्ये महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत झाली.
एकूण ५९ पैकी सर्वात २७ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले तर भाजपचे नगराध्यक्ष पदासह सदस्य १४ निवडून आले. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे.
नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने पारंपरिक मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत वेगळा गट स्थापन करून सत्ता स्थापनेची तयारी सुरु केल्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनीभाजप आणि काँग्रेसची युतीवर खरमरीत टीका केली. नगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, शिवाय भाजपच्या नगराध्यक्षा देखील निवडून आल्या. त्यामुळे पारंपरिक भाजप आणि शिवसेना युती व्हायला हवी होती. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा देखील सुरु होती, मात्र भाजपने सत्तेसाठी काँग्रेससोबत युती केली असल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अंबरनाथ भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त करण्याचे आश्वासन भाजपाने अंबरनाथकरांना दिले होते, त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेवूनच सत्ता स्थापन करावी लागणार होती, असे भाजपाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील म्हणाले.
सत्ता स्थापनेसाठी भाजपचे १४ नगरसेवक आणि एक अपक्ष तसेच काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादीचे चार असे एकूण ३१ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे एकूण ३२ संख्याबळ असल्याचे गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या १२ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष आणि पाच स्वीकृत नगरसेवक पदांसाठी प्रक्रिया पार पडणार आहे.