श्रेष्ठत्वाची लढाई!

महायुतीचा निर्णय कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना कसा पटवून द्यायचा असा प्रश्न शिवसेना-भाजपा नेत्यांना पडला आहे. उभय पक्षांतील खदखद आता बाहेर पडू लागली असून ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलणारे नेते त्यांचा हवाला देऊन बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी खुलासा करण्याचे कष्ट घेताना दिसत नाही. कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागल्यामुळे मधल्या फळीतील नेते कुंपणावर बसणे शहाणपणाचे मानू लागले आहेत. भाजपाला विधानसभेत मिळालेल्या यशामुळे ‘एकला चलो रे’ची भावना आली आहे. या आत्मविश्वासातूनच सेनेची संगत नको असे उघडपणे इच्छुक मंडळी बोलू लागली आहेत. त्यास उदात्त रुप मिळावे म्हणून पक्षवाढीचे कारण पुढे केले जात आहे. त्यात तथ्य असले तरी प्रदेशपातळीवरील निर्णयाचे त्यात उल्लंघन होणार असे एकूण वातावरण दिसत आहे.

ठाणे महापालिकेत शिंदे यांच्याकडे ८२ तर भाजपाकडे २४ नगरसेवक आहेत. ठाण्यात पूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून यायचा. परंतु आता श्री. संजय केळकर दोन टर्म निवडून येत आहेत. त्यांची तिसरी टर्म सुरू आहे आणि त्यामुळे भाजपाला आपली ताकद वाढली आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. शिवसेनेचे मात्र त्याबाबत दुमत आहे. त्यांच्या मते केळकर यांच्या विजयात सेनेचा सिंहाचा वाटा होता आणि त्याच्या आधारे ते भाजपाला जादा जागा सोडण्यास राजी नाहीत. ठाण्यात सेनेची पाळेमुळे घट्ट रोवली गेली असून भाजपाला फळे चाखायला मिळत असतात. भाजपाला हा युक्तीवाद मान्य नाही आणि त्यातून महायुतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुळात भाजपा आणि शिवसेना यांची मतपेढी ही प्रामुख्याने हिंदुत्वावर बेतलेली आहे. या जोरावरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ते जिंकत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दोघांना भावत असल्यामुळे मतदान हे मोदींच्या नावाने निर्विवाद होत असते. तिथे या दोघांमध्ये वितुष्ट नसते. ठाण्यात नरेश म्हस्के आणि कल्याणमध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विजयात भाजपाचा सहभाग नाकारता येणार नाही. अर्थात भाजपाने असहकार केला असता तर सेना उमेदवारांचे पराभव झाले नसते. मताधिक्य कमी झाले असते. शिवसेनेने नेमका हा धागा पकडून भाजपाने जागावाटप हा विषय विनाकारण प्रतिष्ठेचा विषय बनवू नये असा पवित्रा घेतला आहे.

एकीकडे कोण कोणावर अधिक अवलंबून असेल अथवा एकत्र येण्याचा कोणाला अधिक लाभ होईल हे विषय जागावाटपाच्या वेळी विचारात घेतले जातील. राजकीय दृष्टीने त्याबाबत मतभेद जरूर होत राहतील. परंतु भाजपा त्यांच्या मध्यम वर्ग आणि अमराठी धार्जिण्या प्रतिमेचा फायदा होईल असा पवित्रा घेऊन जादा जागांवर ठाम राहणार. उभयतांमधील हा तंटा अनिर्णित तर राहतोच, परंतु त्याहीपेक्षा यदाकदाचित इच्छुक बंडखोरी करू लागले तर त्यावर त्यांच्याकडे इलाजही नसेल. श्रेष्ठत्वाची ही लढाई वेळीच थांबली तर महायुतीच्या पथ्यावर पडेल.