सोप्या फॉर्म्युलापेक्षा न्याय मार्ग हवा !

महापालिका निवडणुकीत महायुती झाली असली तरी जागावाटप करताना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेणे केव्हाही इष्ट ठरते. शिवसेना-भाजपाने त्यादृष्टीने जिंकलेला विद्यमान प्रभाग त्या-त्या पक्षाकडे ठेवण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे त्यास तर्काचा आधार मिळतो आणि संभाव्य संघर्षही टळतो. अर्थात हा निकष ठरवताना मागच्या निवडणुकीस आठ वर्षे लोटली आहेत आणि या प्रदीर्घ काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे ज्याचा प्रभाग त्याला हे गणित कितपत यशस्वी ठरेल याबद्दल शंका आहे.

आठ-दहा वर्षांच्या खंडानंतर या निवडणुका होत आहेत. या काळात विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका झाल्या. पक्ष फुटले, युत्या-आघाड्या झाल्या आणि शत्रू, मित्र तर मित्र, शत्रू बनले. मतदारांची मानसिकता या उलथापालथीमुळे गढूळ झाली. ते संभ्रमावस्थेत आहेत आणि कोणाला कल देतील हे सांगता येणार नाही. अशा स्थितीत प्रभागवार पक्षीय बलाबलाचा विचार करणे सोपे वाटत असले तरी हा फॉर्म्युला प्रत्यक्षात किचकट आहे. महायुतीचे म्हणून झालेल्या मतदानात आपला वाटा सिंहाचा होता असा दावा केला जात असला तरी तो मित्रपक्षाला मान्य नाही. त्यामुळे प्रभागात दोघांनाही प्रतिनिधीत्व दिले जावे हा आग्रह धरला जाऊ शकतो. त्यासाठी तडजोड करावी लागेल. थोडे हातचे सोडावे लागेल. युती धर्मासाठी हे करण्यास किती जण राजी होतील हा प्रश्न आहे. तसे कोणी तयार होणार नाही म्हणून ज्याचा प्रभाग त्याला हा सोपा मार्ग निवडलेला दिसतो. सोपा म्हणजे सह-संमतीचा नाही, हे वास्तव आहे. नेत्यांना बंडखोरीची डोकेदुखी टाळायची आहे, परंतु सर्वच पक्षांमध्ये राजकीय इर्षा गगनाला टेकली असल्यामुळे अनेक उमेदवार अट्टाहासाने पेटून उठले आहेत. ते श्रेष्ठींचा आदेश कितपत जुमानतील हा प्रश्नच आहे. बंडखोरी होऊ नये, कार्यकर्त्यांची मने दुभंगू नये आणि महायुतीवर विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अर्थात त्यासाठी प्रभागवार सरसकट जी फूटपट्टी निवडण्यात आली आहे, त्यापेक्षा विद्यमान नगरसेवकांची कामगिरी आणि इच्छुक उमेदवाराची जमेची बाजू लक्षात घेऊन जागावाटप झाले तर ते जनतेच्या हिताचे होईल.

महायुतीला जिंकण्याचा आत्मविश्वास आहे आणि त्यास पुष्टी देत आहे जुनी आकडेवारी. हे पक्षीय बलाबल बदललेल्या परिस्थितीत टिकेल का, पक्षांतर्गत वाद उफाळून वर येणार नाहीत ना आणि मतांची विभागणी होणार नाही यादृष्टीने सोप्या मार्गापेक्षा व्यावहारिक आणि बदललेल्या परिस्थितीचा विचार करणे संयुक्तिक ठरेल.