बिगुल वाजले, प्रतिष्ठा पणाला!

बहुचर्चित आणि अति-प्रलंबित महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय अवकाशातील अधांतरीतपणाला निश्चिती येणार आहे. महायुतीचे काय होणार, महाआघाडीत काँग्रेस राहणार काय, भाजपा असो की अन्य कोणताही प्रस्थापित पक्ष, प्रतिस्पर्ध्याच्या कंपुतील भांडणांचा लाभ पडद्यामागून बंडखोरांना मदत करीत उठवणार काय, अशा असंख्य प्रश्नांवर नेत्यांना भूमिका जाहीर करावी लागणार आणि मतदान होईस्तव त्यास चिकटून राहावे लागणार. भले आवडले नाही तरी. राज्य पातळीवर नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असून कोणास मतदार ‘लाडके’ ठरवणार हे आता कळेल. जर-तरची भाषा आणि भाकिते बंद आता सर्वकाही रोखठोक!

मतदार याद्यातील गोंधळावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. विपक्षांचा वेळ आणि शक्ती मात्र नक्की वाया गेली. निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता याद्यांमध्ये अडकून राहण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा मतदारांना भेटून सत्तारुढ पक्षाच्या त्रुटी दाखवणे आणि आपण संधी दिली तर कशी उत्तम कामगिरी बजावून दाखवू हे सांगायला हवे. त्यासाठी सोपा मार्ग जाहीरनाम्यांचा असतो. परंतु तो फसवा असतो याची खात्री समस्त मतदार बांधवांना पटली असल्याने राजकीय पक्षांनी अधिक विश्वासार्ह मार्गाचा अवलंब करायला हवा. त्यात सुसंवाद हा उत्तम प्रकार आहे. परंतु अनेक उमेदवारांना ही कला अवगत नसते; त्यांच्यासाठी निवडणूक जिंकण्याचा प्रमुख निकष हा पैसा आहे. गैरमार्गाने शक्ती-प्रदर्शन (मसल पॉवर) याचाही उपयोग केला जातो. त्यांची ही सवय त्यांना लख लाभ होवो. मतदारांनी ती जुमानता कामा नये.

राजकीयदृष्ट्या महापालिकांच्या या निवडणुका महत्वाच्या आहेत, कारण जवळजवळ राज्यातील २५ टक्के मतदार त्यात सहभाग घेणार आहेत. राज्याचा कौल काय आहे हे नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल २१ तारखेला जाहीर होताच कळेल. त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो. महायुतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास दुजोराही दिला आहे. आम्हाला मात्र महायुतीला लागणारी उभय कार्यकर्त्यांतील सौहार्दता किती असेल याबद्दल शंका आहे. ठाण्यात श्री. शिंदे यांची अग्निपरीक्षा असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांची बार्गेनिंग पॉवर आणि राज्याच्या राजकारणातील स्थान या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे. नवी मुंबईत गणेश नाईक असो की कल्याण-डोंबिवलीत रविंद्र चव्हाण, या भाजपा नेत्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहेच. त्याचा विपरित परिणाम आणि ठाकरे बंधूंचे एकत्र येणे असे तिहेरी आव्हान श्री. शिंदे यांना पेलावे लागणार आहे.

या निवडणुकीकडे मतदार राजकीय चष्म्यातून बघतील की विकासाच्या दृष्टीने, यावर पक्षांचे भवितव्य अवलंबून असेल. प्रचारासाठी कोणते मुद्दे जिव्हाळ्याचे आणि जवळचे ठरतील याचा सर्वच पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी भाजपाची ताकद वाढत आहे. सहापैकी चार आमदार त्यांचे आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अटीतटीची होणार यात वाद नाही आणि शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची!