खा. म्हस्के यांच्या विजयाविरोधातील याचिका फेटाळली

ठाणे: खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीतील विजयाला पराभूत उमेदवार माजी खासदार राजन विचारे यांनी दिलेली आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाज छागला यांनी फेटाळून लावली आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघातून उबाठाचे उमेदवार माजी खासदार राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये श्री. म्हस्के यांना सात लाख ३४,२३१ मते मिळाली होती. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्री. विचारे यांचा दोन लाख १७०११ मतांनी पराभव केला होता. त्याला श्री. विचारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होऊन आज न्यायमूर्ती छागला यांनी माजी खासदार श्री. विचारे यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे खा. श्री. म्हस्के यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत खा. श्री म्हस्के यांनी समाजमाध्यमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून सत्य परेशान हो सकता है पराजित नही, लोकशाही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतरही प्रतिस्पर्धी उबाठा गटाच्या उमेदवाराने रडीचा डाव खेळून न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुकीला आव्हान दिले होते, परंतु न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल दिला असून हा विजय माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या माझ्या मतदारांचा आहे, अशी प्रतिक्रिया श्री.म्हस्के यांनी दिली आहे. हा विश्वास शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामावर असल्याचे श्री. म्हस्के यांनी म्हटले आहे.