ठाण्यात आणखी चार दिवस ५०टक्के कपात
ठाणे: कल्याण फाटा येथील जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप झालेली नसून मागील आठवडाभर ३० टक्के आणि नंतर ५० टक्के पाणी कपातीमुळे ठाण्याला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. अशात दुरुस्ती पूर्ण न झाल्याने पाणी कपात आणखी चार दिवस वाढवण्यात आली आहे.
कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मि.मी. व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी 11 डिसेंबर 2025 रोजी नादुरूस्त झाली होती. ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु या कामास आणखी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाणे शहरात 19 डिसेंबरपर्यंत 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत प्रत्येक भागास दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.