भीषण पाणी टंचाईने नागरिक बेहाल
कसारा: कसारा मोखावणे परिसरात खासगी विकासकाकडून बेकायदेशीररित्या सुरुंग स्फोट घडवून स्वतःच्या फायद्यासाठी बंधारा बांधल्यामुळे कसारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाला हानी पोहचली आहे. अवैध सुरुंग स्फोटामुळे कसारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात पाणीच नसल्याने कसारा शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.
सन १९८५ साली बांधण्यात आलेल्या कसारा तलावातील पाणी क्षमता वाढवण्यासाठी सन २०२१ साली १५ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती वाढीवक्षेत्र तयार करण्यात आले. दरम्यान वाढीव पूरक पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिका-यांना हाताशी धरून अपूर्ण व निकृष्ट पाणी योजना ग्रामपंचायत कसारा मोखावणे यांच्याकडे वर्ग केली. यादरम्यान ठेकेदाराच्या कामाची पारदर्शकता न बघता ग्रामपंचायतने ताब्यात घेतलेली पाणी योजना दोन वर्षे सुरळीत सुरु राहिली, परंतु त्यानंतर जलवाहिनी फुटणे, गळती होणे असे प्रकार सुरु झाले.
मागील वर्षी कसारा मोखावणे येथे एका खासगी विकासकाने बंगल्यांच्या कामासाठी प्लॉटिंगचे काम सुरु केले. या विकासकाला विविध कामांसाठी तसेच खासगी बंधारा बनवण्यासाठी परवानगी देण्यासाठी मागील वर्षी ग्रामपंचायत मोखावणे कसाराच्या वतीने ग्रामसभा घेऊन एक मताने ठराव घेण्यात आला. या ठरावात विकासकाला सुरुंग स्फोटासह विविध बेकायदेशीर कामांना परवानग्या देखील देण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव असल्यामुळे विकासकाने बेकायदेशीर विहिरी खोदणे, बेकायदेशीररित्या सुरुंग स्फोट घडवणे सुरु केले.
पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाचशे ते सातशे मिटर अंतरावर डोंगर, टेकड्या फोडण्यासाठी दररोज सुरुंग स्फ़ोट घडवण्यात आले. डोंगर फोडून खासगी बंधारा देखील तयार करण्यात आला. मात्र विकासकाच्या नियमित सुरुंग स्फ़ोटामुळे कसारा तलावातील जलस्रोत तसेच परिसरातील जिवंत झरे, व जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जलस्रोत दुभागले गेले, अनेक जिवंत झं
झऱ्यांची दिशा बदलली गेली. परिणामी या सुरुंग स्फ़ोटामुळे व पाण्याच्या गळतीमुळे आजमितीस कसारा मोखावणे तलावातील पाणी संपले आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस येणाऱ्या पाण्याला सुद्धा कसारावासियांना मुकावे लागत आहे. सद्या कसारावासियांना विहिरी, झरे, रेल्वे स्थानकावरील नळांचा आधार घ्यावा लागत आहे.